
अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्यातील धामनवण येथे तालुका कृषी अधिकारी माधव हासे, मंडळ कृषी अधिकारी गिरीष बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांनी गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका कशा कराव्यात यासंदर्भात मोहीम स्वरूपात भात बियाणे बीजप्रक्रिया व भात पिकाची गादीवाफ्यावर रोपवाटिका कशी करावी या संदर्भात धामनवण येथील शेतकरी रावजी नामदेव बारामते, मधुकर तुकाराम बारामते या शेतकर्यांचा शेतावर प्रत्यक्ष भात बीजप्रक्रिया व गादीवाफ्यावरील भात पिकांची रोपवाटिका या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवून शेतकर्यांना कृषी सहाय्यक शरद लोहकरे, कृषी पर्यवेक्षक यशवंत खोकले यांनी मार्गदर्शन केले.
परिसरातील इतरही शेतकर्यांनी स्वतःकडील भात बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी 300 ग्रॅम मीठ प्रति दहा लीटर पाण्यात विरघळून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्तिर होऊ द्यावे, तरंगणारे पोचट,हलके, कीडग्रस्त, रोगट बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सावलीत सुकवावे व नंतर पेरणी करावी. किंवा भाताच्या प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी.तसेच शेतकर्यांनी गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका तयार करतांना तळाशी 120 सें. मी (4 फूट) पृष्ठभागावर 90 सें. मी रुंदी (3 फूट) आणि 8 ते 10 सें. मी उंचीचे आणि उतारानुसार योग्य प्रकारे लांबी ठेऊन शेतकर्यांनी गादी वाफे तयार करावेत.
तसेच गादीवाफ्यावर एक गुंठ्यासाठी 100 किलो कुजलेले शेणखत, 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि साधारण 1 किलो एम ओ पी किंवा 15:15:15 या रासायनिक खतांच्या मात्रा गादीवाफ्यावर बियाणे पेरणीपूर्वी मातीत मिसळून द्यावे. व नंतर बियाणे पेरणी करावी. गादीवाफ्यावर भात रोपवाटिका केल्यामुळे शेतकर्यांची बियाणे बचत होते. निंदनी करणे सोपे जाते, रोपांची वाढ चांगली होते, रोपांची मर होत नाही, जास्त पाऊस झाल्यास सरीतून पाणी निघून जाते, भात रोपे काढण्यास सोपे जाते, लागवडीसाठी भात रोपे लवकर तयार होतात.
अशा प्रकारे भात पीक घेणार्या शेतकर्यांनी भात बीजप्रक्रिया व गादीवाफ्यावरील भात रोपवाटिका कशा कराव्यात या संदर्भात मार्गदर्शन मोहिमेत कृषी सहाय्यक निलेश धिंदले, रुपेश सुपे, सचिन साबळे, साहेबराव वायळ हे प्रत्यक्ष सहभाग नोंदवून शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहे.