
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील देवराई येथील खून खटल्यातील मुख्य संशयित अनिल पालवे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.
देवराई वविध कार्यकारी सेवा संस्थेची 18 जुन 2022 रोजी सार्वत्रीक निवडणुक झाल्यानंतर श्री बालाजी शेतकरी विकास मंडळ पॅनल विजयी मिरवणुक देवराई येथुन वृद्धेवेश्वर रस्त्याने गाणे वाजवत जात होती. यावेळी पराभूत पॅनल प्रमुख व या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अनिल एकनाथ पालवे, सुनिल एकनाथ पालवे व इतर संशयितांनी तलवार, सुरा, कुर्हाडी, लोखंडीसळया, लाकडी, लाकडी दांडके, काठ्या घेऊन विजयी गटावर हल्ला केला होता. यामध्ये अजय गोरक्ष पालवे याचा जागेवरच मृत्यु झाला होता.
अटकेनंतर जिल्हा न्यायालयाने अनिल एकनाथ पालवे यास जामीन नाकारला होता. मात्र सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. या विरोधात बाळासाहेब नवनाथ पालवे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन रद्द होण्याकरीता अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने आरोपी अनिल पालवे यास दिलेला जामीन हा चुकीच्या पद्धतीने दिलेला असून सदर आरोपीच्या विरोधात पुरावा उपलब्ध असतांनाही त्यास जामीनावर मुक्त केले आसा युक्तीवाद वकिलांनी केला.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोषारोप पत्राचे अवलोकन केल्यानंतर तसेच उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून अनिल पालवे यास सत्र न्यायालयाने दिलेला जमीन रद्द करत संशयित अनिल पालवे यास पोलीसांसमोर शरण जाण्याचे आदेश देण्यात आले. सदरील प्रकरणामध्ये फिर्यादी यांच्या वतीने अॅड. नरवडे यांनी काम पाहिले.