देवळाली प्रवरात नशेबाज तरूणांनी फलक फाडले

फिर्यादीच नसल्याने पोलिसांनी सोडून दिले || नागरिक संतप्त; धार्मिक व दुकानाचे 10 फलक फाडले
देवळाली प्रवरात नशेबाज तरूणांनी फलक फाडले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नशेबाज तरुणांनी देवळाली प्रवरा येथील बाजारतळ व सोसायटी नाक्यावरील अनेक दुकानदारांचे धारदार शस्त्राने फलक फाडले, नशेत रात्रभर आरडाओरडा करून धिंगाणा घातला. नशेत तर्रर झालेले ते तरूण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. त्यावरून त्यांची ओळख पटल्यानंतर काही नागरिकांनी त्यातील एका तरूणाला पोलिसांच्या हवाली केले.

मात्र, फिर्याद देण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने स्थानिक पोलिसांनी त्या तरूणाला सोडून दिले. त्यामुळे स्थानिक पोलिसांविषयी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता कोणी तक्रार केलीच नाही मग आमच्या पोराला पकडलेच कसे? आणि का? असा सवाल करीत त्या तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसांनाच धारेवर धरत पोलिसांविरूद्ध जिल्हा पोलीस प्रमुखांकडेच तक्रार करण्याची तंबी पोलिसांना दिली. त्यामुळे स्थानिक पोलिसांना पळता भूई थोडी झाली. या घटनेमुळे नागरिकांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, फलक फाडण्याच्या घटनेत गस्तीवरील पोलीस फिर्यादी का झाले नाहीत? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

देवळाली प्रवरा येथील दोन नशेबाज तरुणांनी गांजाची नशा करुन नशेत धुंद असताना शहरातील विविध दुकानांबरोबर सामाजिक, राजकीय, संघटना व धार्मिक फलक फाडल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले. परंतु नशेबाज तरुणांनी हे कृत्य केल्याचे समजल्या नंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेतील दोन तरुणापैकी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरा तरुण मात्र, पसार झाला. मात्र, फिर्याद दाखल करण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने पोलिसांनी पकडलेल्या आरोपीस सोडून दिले.

देवळाली प्रवरा सोसायटी चौकात नशेबाज दोन तरुणांनी मध्यरात्री 12 ते 3 च्या दरम्यान प्रशांत कोठुळे यांच्या उपसरपंच चहा दुकानाचे फलक फाडल्यानंतर शेजारीच असलेला धार्मिक फलक लगतच्या टपरीवर चढून धारदार शस्त्राच्या साहाय्याने फाडला. त्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या दिगंबर विधाटे यांचे या दुकानासमोर असलेला फलक तरुणांनी फाडला. हे कृत्य करत असताना सोसायटी व चहा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हे तरुण कैद झाले. बागायत पीक संस्थेसमोरील रस्त्याच्या कडेला प्रहार संटघनेचा निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचा अभिनंदनाचा फलक या दोन तरुणांनी फाडला.

नशेत धुंद झालेल्या या दोन्ही तरुणांनी रस्त्याने आरडाओरड करीत बाजारतळावरील सर्कल जवळील ईद, जयंती इतर फलक फाडून जवळच असलेल्या आण्णासाहेब भारत यांच्या चहा दुकानाचा फलक फाडला. याच दुकानाशेजारील गोकुळ कणगरे यांच्या टपरीसमोरील बाजूने फलक फाडून मोडतोड केली.त्यानंतर सलिम शेख यांच्या पान दुकानाचा फलक फाडला.

ज्या दुकानांचे फलक फाडले, त्या सर्व दुकानदारांना भेट देऊन त्या तरूणांनीच उलट हे कोणी फाडले? अशी विचारणा केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला हाच तो तरुण असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना या तरुणाची माहिती देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशनला नेले. मात्र, फिर्याद देण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने त्या तरुणास सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, धार्मिक फलक फाडल्यावरुन शहरात दंगल व इतर काही प्रकार घडला असता तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करुन पोलीस स्वतःच फिर्यादी होतात. शहरातील 9 ते 10 फलक फाडलेले असताना व फाडणारे सीसीटीव्हीत कैद झालेले असताना रात्रीच्या गस्तीवरील पोलीस फिर्यादी का झाला नाही? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.