देवळालीत दोन गटांत तुफान हाणामार्‍या

पोलिसांना पोहोचला ‘लेट करंट’
देवळालीत दोन गटांत तुफान हाणामार्‍या

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

देवळाली प्रवरात बाजारतळावर दोन गटात पैसे देण्या-घेण्यावरून तुफान हाणामार्‍या झाल्या. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कळवूनही ते उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांना ‘लेट करंट’ लागल्याने तोपयर्ंत शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसान तुफान हाणामारीत झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

काल दुपारच्या सुमारास देवळाली प्रवरा येथील बाजारतळावरील एका हॉटेलात एका तरूणाने हॉटेलचालकाला पैशावरून दबंगगिरी केली. त्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जोरदार हाणामारी सुरू झाली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवूनही ते थेट उशिरा घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हाणामारी वाढली. एका गटातील काही तरुणांनी त्या हॉटेलचालकाच्या घरी जाऊन महिलेलाही मारहाण केली. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळले. यात नागरिकांबरोबरच स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

देवळाली प्रवरा शहरात चोर्‍या, हाणामार्‍या आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, गुन्हेगारी वाढूनही स्थानिक पोलीस चौकीत हजर नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा गुन्हेगार व पोलिसांवरील वचक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

देवळाली प्रवरात जुगार, मटका अड्ड्यांना उधाण आले असून गावठी हातभट्टींचे दारूअड्डेही वाढले असून पोलिसांचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com