देवळालीच्या व्यापार्‍याला तीन लाखांना गंडा

देवळालीच्या व्यापार्‍याला तीन लाखांना गंडा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

खात्यावर ऑनलाईन पेमेंट पाठवा, तुमचा माल तुमच्या दुकानात पोहच होईल, असे सांगून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नरेंद्र मुथा या व्यापार्‍याला जवळपास तीन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापार्‍याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

नरेंद्र खुशालचंद मुथा (वय 55) रा. देवळाली प्रवरा यांचे देवळाली प्रवरा येथे मुथा सेल्स नावाचे एजन्सींचे दुकान आहे. मुथा हे त्यांच्या दुकानात तेल व खाद्य पदार्थांची ठोक खरेदी व विक्री करतात. त्यांना ठोक स्वरुपात कंपनीकडून तेल खरेदी करावयाचे असल्याने त्यांनी 9 जानेवारी रोजी मध्यप्रदेश येथील व्हीपी इंडस्ट्रीज देवास यांचा संपर्क क्रमांक असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज केला. त्यांनी नरेंद्र मुथा यांना व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश या कंपनीचे तेलाचे दर पाठवले.

त्यावेळी नरेंद्र मुथा यांनी सोयाबीन तेलाची ऑर्डर देऊन दि. 10 जानेवारी 2023 रोजी मुथा यांनी त्यांच्या खात्यावर 2 लाख 61 हजार रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी दि. 11 जानेवारी रोजी फोन आला की, तुम्ही काल तेल खरेदी करण्यासाठी जी ऑर्डर दिली आहे, ती गाडी लोड करण्यासाठी कमी होत आहे. तुम्हाला अजून 20 सोयाबीन तेलाचे बॉक्स खरेदी करावे लागतील.

नरेंद्र मुथा यांनी आणखी 30 हजार 120 रुपये त्यांनी दिलेल्या खाते नंबरवर पाठविले. अशा प्रकारे त्यांनी एकूण 2 लाख 91 हजार 120 रुपये त्यांच्या खात्यावर पाठवीले. त्यांच्याकडून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट मिळाले. तसेच 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला माल तुमचे दुकानावर पोहोच होईल, असा मेसेज पाठविला.

16 जानेवारी पर्यंत माल पोहोच न झाल्याने नरेंद्र मुथा यांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज केला. तेव्हा त्याने माझाया आईचे निधन झाले आहे. तुमचा माल दोन दिवसांनी पाठवतो असे मेसेजव्दारे सांगीतले. नरेंद्र मुथा यांनी दोन दिवस वाट पाहून तेलाचा माल पोहोच न झाल्याने त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केला. त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही. नरेंद्र मुथा यांनी चौकशी केली असता त्यांनी ज्या खात्यावर रक्कम पाठवली ते खाते अनामिका सिंग यांचे नावावर असून ते राजस्थान मधील कोटा येथील आहे, अशी माहिती मिळाली.

नरेंद्र मुथा यांनी व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश येथे त्यांचे अधिकृत फोनवर संपर्क करुन तेलाचे ऑर्डर बाबत विचारले असता त्यांनी आम्हाला तुमची तेलाची कुठलीही ऑर्डर मिळालेली नसून पैसेही आमचे व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेशच्या बँक खात्यावर जमा झालेले नसल्याचे सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नरेंद्र खुशालचंद मुथा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. 76/2023 भादंवि कलम 420, 465 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com