स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली प्रवराला दोन मानांकन

पुरस्काराचे श्रेय नागरिक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना- सत्यजित कदम
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली प्रवराला दोन मानांकन

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2021 घेण्यात आले होते. त्याचा पुरस्कार सोहळा 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये देशातील 4242 शहरांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील महानगर पालिका, नगरपरिषद व नगरपंचायती असलेल्या अशा 22 शहरांना पारितोषिके मिळाले आहेत. त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्वच्छ शहर व कचरा मुक्त शहर असे दोन मानांकन मिळाले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संयुक्त सचिव व अभियान संचालिका रूपा मिश्रा यांनी या पुरस्काराबाबत पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

दरवर्षी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून संपूर्ण भारतभर स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाते. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून स्वच्छ सर्वेक्षण 2021 या सर्वेक्षणात भाग घेण्यास व परीक्षणास सुरुवात झाली. या सर्वेक्षणाचे स्वरूप तिमाहीत करण्यात आले होते. यामध्ये एकूण स्पर्धा 6000 गुणांची होती. तर त्यामध्ये शहरात असलेले नागरिकांसाठी स्वच्छतेच्या सुखसोयी शौचालये, मुतार्‍या व इतर सुविधा, सांडपाणी गटारी, विलगीकरणासह कचरा संकलन, वाहतूक, पुन्हा विलगीकरण तपासणी, त्यावर प्रक्रिया, हागणदारी मुक्त शहर मानांकन प्रशस्तिपत्रक, नागरिकांचा सहभाग असे अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेसह उपलब्ध असलेल्या सुविधांवर आधारित या वेगवेगळ्या विषयावर गुणांचे विभाजन केलेले होते. याचे प्रत्यक्ष परीक्षण गेल्या मार्चमध्ये केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या निरीक्षक पथकाद्वारे करण्यात आली होती. हागणदारीमुक्त शहर ओडीएफ मानांकन व कचरामुक्त शहर हे दोन मानांकन मिळाले आहे.

महाराष्ट्रातून 395 शहरांनी भाग घेतला. त्यापैकी देवळाली प्रवरा शहरासह विटा, लोणावळा, सासवड, महाराष्ट्र्र राज्य, नवीमुंबई, पुणे, बृहन्मुबई, कर्‍हाड, हिंगोली, खोपोली, कामटी, पाचगणी, तेवसा, पन्हाळा. मुरगूड, धानोरा, पनवेल, बद्रावती, मूळ, दोंडाईचा व खानापूर अशा 22 शहरांना मानांकने मिळाली आहेत. मानांकन/पुरस्कार वितरण सोहळा येत्या 20 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी आणि स्वच्छ भारत मिशनच्या सचिव रूपा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

नाशिक विभागातून देवळाली प्रवरा व दोंडाईचा या फक्त दोनच शहरांना हे मानांकन मिळाले आहे. यापुढे देखील आता शहरात भूमिगत गटार व मलनिस्सारण हा प्रकल्प रावबिला जाणार असल्याने याचा नक्कीच येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये मोठा फायदा होईल व यापुढे देखील शहर सातत्याने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाग घेत राहील व हे मानांकन नागरिकांच्याच सहकार्याने मिळाले असल्याने मी शहरातील सर्व नागरिकांचे विशेष अभिनंदन करतो. स्वच्छतेत प्रत्यक्ष काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी व मुख्याधिकारी, सर्व सहकारी नगरसेवक यांचे आभार मानतो, असे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले.

शहराला कचरा मुक्त शहर व स्वच्छ शहर मानांकन मिळाल्याचे संपूर्ण श्रेय शहरवासीयांना जाते. आपल्या सहकार्याने देशात सर्वोत्तम स्वच्छ शहर पुरस्कार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- नगराध्यक्ष सत्यजित कदम

नागरिकांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे. मी नागरिकांचे व सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करते व आभार मानते. यापुढेही असे सहकार्य करून आपल्या शहराचे नाव देशात प्रथम क्रमांकावर न्यावे, असे आवाहन करते.

- मुख्याधिकारी नेहा भोसले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com