
देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
शिवसेनेमुळेच सेनेच्या सर्व आमदारांना मानसन्मान व मंत्रिपद मिळाले. त्यांनी बंडखोरी करून सेनेशी गद्दारी केली. बंडखोरी केलेल्या आमदारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी दिला आहे.
कराळे म्हणाले, आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत. आजही शिवसेनेत आहोत, उद्याही शिवसेनेतच राहणार आहोत. लाखोंचा जनाधार असणारी अशी पक्षसंघटना संपत नसते. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी पाईक आहोत. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्य माणसाला शिवसेनेत घेऊन मोठ्या पदावर विराजमान केले.
यांच्यावर उध्दव ठाकरे यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांनीच सत्तेच्या लालसेपायी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले.अशा गद्दारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असे कराळे यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर देखील देवळाली प्रवरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी कधीही देवळाली प्रवरा शिवसेनेला योग्य सन्मान दिला नाही किंवा विश्वासात घेतले नाही. तरीपण आघाडी धर्म पाळायचा म्हणून आम्ही सर्व सहन केले. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहणार आहोत, असे कराळे यांनी सांगितले.