देवळाली सोसायटीत सत्ताधार्‍यांची एक जागा बिनविरोध होणार?

देवळाली सोसायटीत सत्ताधार्‍यांची एक जागा बिनविरोध होणार?

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

देवळाली प्रवरा सोसायटीच्या निवडणुकीत उमेद्वारी अर्ज माघारीपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली आहे. सोसायटीतील वि.ज.भ.ज. गटातील निवडणूक बिनविरोध करण्याची सत्ताधार्‍यांची खेळी विरोधकांनी हाणून पाडल्यानंतर सत्ताधार्‍यांनी पुन्हा शहाला काटशह देत विरोधी उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने आपला उमेद्वार बिनविरोध करण्याचा डाव यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळे सत्ताधार्‍यांची सरशी झाली. तर विरोधकांच्या उमेद्वाराने नाट्यमरित्या अर्ज माघारी घेतल्याने विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आता देवळाली प्रवरा सोसायटीच्या तोंडावर वि.ज.भ.ज.गटातील एक जागा बिनविरोध झाली. सत्ताधारी मंडळींची ही खेळी यशस्वी झाल्याने होणार्‍या निवडणुकीसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

देवळाली प्रवरा सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 19 जून रोजी होत आहे. त्यानिमित्ताने संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर 100 उमेदवारी अर्ज शिल्लक होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 3 जून आहे. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये 11 उमेदवारी अर्ज वि.ज.भ.ज. गटातील बाद झाले होते. त्यामुळे या गटात एकूण 13 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. पैकी 12 उमेदवारी अर्ज सत्ताधारी मंडळींनी आपल्या मर्जीतील लोकांचे दाखल केले होते.

तर विरोधकांनी अंतिमक्षणी एक उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे हा गट बिनविरोध होता होता राहिला. ही बाब सत्ताधारी मंडळींच्या लक्षात आली. म्हणूनच त्यांनी असा काही राजकीय डाव टाकला, विरोधकांच्या त्या उमेदवाराने मंगळवार दि. 24 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे सत्ताधारी मंडळींचा ही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने एक जागा बिनविरोध करून निवडणुकीत विरोधकांना काटशह दिला आहे. सर्व खेळी विरोधकांच्याही लक्षात आली असून त्यांचेही राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com