देवळालीचे ते 184 नव्हे केवळ 54 सभासद अपात्र

संस्थेचे अध्यक्ष ढुस व संचालक कदम यांची टीका
देवळालीचे ते 184 नव्हे केवळ 54 सभासद अपात्र

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा सोसायटीच्या 184 सभासदांचे सहाय्यक निबंधक यांनी सभासदत्व रद्द केले, अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. संस्थेचे 87 सभासद मयत आहेत. 43 सभासदांनी शेअर्स रक्कम पूर्ण न भरल्याने त्यांचे सभासदत्व रद्द झाले आहे. असे एकूण 130 सभासद आहेत. सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपिल केलेल्या 194 सभासदांपैकी 54 सभासद अपात्र ठरले व 10 सभासदांचे अपिल मंजूर करण्यात आले. म्हणजेच एकूण 54 सभासद अपात्र ठरले आहेत. मात्र, विरोधकांनी संस्थेचे 184 सभासद रद्द झाल्याचा जावईशोध लावला आहे. अशी अफवा पसरविण्यापूर्वी एखाद्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे अवश्यक होते, असा टोला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढुस व संचालक शहाजी कदम यांनी लगावला आहे.

संस्थेचे अध्यक्ष ढुस व संचालक कदम यांनी सांगितले, विरोधकांनी सहकारी संस्था अधिनियम व पोटनियमातील तरतुदीचा आधार घेऊन 10 गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सभासदांना संस्थेचे सभासद राहता येत नाही. या तरतुदीचा आधार घेऊन 184 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी राहुरीचे सहा. निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली होती. यावरून देवळाली सोसायटीच्या 184 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. अशी अफवा सभासदांमध्ये पसरुन दिली होती. हे धादांत खोटे असून संस्थेचे फक्त 54 सभासद अपात्र ठरले आहेत. ते याविरुध्द न्यायालयात दाद मागणार आहेत.

पूर्वी संस्थेने काही लोकांना छोट्या व्यवसायासाठी अर्थ सहाय्य केले होते. असे काही व्यापारी व तत्सम लोकांना तात्कालिन सभासद करून घेण्यात आले होते. परंतु जसजसे सहकार कायद्यात उपविधीप्रमाणे बदल होत गेले, तसे या सभासदांचे सभासदत्व रद्द होत गेले. जे काही शिल्लक होते, अशा सभासदांनी संस्थेच्या शेअर्सची रक्कम पूर्ण न केल्याने 43 लोकांचे सभासदत्व रद्द झाले. तर 87 सभासद मयत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सभासदत्व हे कायद्याप्रमाणे रद्द होणारच होते. असे एकूण 130 सभासद आहेत. ज्या 194 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी सहाय्यक निबंधक, राहुरी यांच्याकडे अपिल केले होते, त्यापैकी 54 सभासद अपात्र ठरले आहेत.

आम्ही हे जनतेपासून लपून ठेवले नाही. विरोधकांनी संस्थेच्या सभासदांचे सभासदत्व रद्द करून काही नथीतून तीर मारला नाही. मयत असल्यामुळे व शेअर्स रक्कम न भरल्याने त्यांचे सभासदत्व रद्द होणारच होते. यात फुशारकी मारण्यासारखे काहीच नाही. याउलट विरोधकांनी 54 सभासदांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला असल्याने त्यांच्यामध्ये विरोधकांविषयी तिव्र नाराजी पसरली आहे. मयत व शेअर्स रक्कम पूर्ण भरणारे सभासद कोण्या एका गटाचे नव्हते. आम्ही संस्थेत राजकारण न करता आमचे मार्गदर्शक माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीरपणे काम केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने पाच वर्षांत तोट्यात असलेली संस्था उर्जितावस्थेत आणली आहे. संस्थेचे सर्व विभाग नफ्यात आहेत. स्वामिनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे शासनाने आदेश दिल्यास आजही संस्था सभासदांना लाभांश वाटू शकते, अशी परिस्थिती संस्थेची आहे. 107 वर्षे झालेल्या या संस्थेला काळीमा फासणार नाही, याची दक्षता घेऊन पाच वर्षे काम केले आहे. मात्र, सत्तेसाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले विरोधक अफवा पसरून सभासदांची दिशाभूल करून षडयंत्र करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ढुस व संचालक कदम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.