
देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयाच्या आवारातील दत्त मंदिरा शेजारी असणारे चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
देवळालीप्रवरा नगर पालिका आवारातील दत्त मंदिरा शेजारील सुमारे 17 ते 18 वर्षाचे जुने चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी पहाटे 4 वाजे दरम्यान चोरुन नेले. कार्यालयाच्या आवारात सीसीटिव्ही कार्यरत असतानाही या सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरांचे चित्रीकरण टिपले नाही.
यावरुन नागरिकांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे हवालदार प्रभाकर शिरसाठ यांनी पाहणी केली. मुख्याधिकारी अजित निकत यांनी पोलीस निरीक्षक यांना पत्राद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे. नगर पालिकेचे दोन राखणदार असतानाही अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरुन नेले कसे? याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.