
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
देवळालीप्रवरा शहरातील पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावर फिरून व्यवसाय करणारे फेरीवाले यांनी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडून फेरीवाल्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरु केली असून पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जात आहे. देवळाली प्रवरा शहरातही ही योजना राबविली जात असून आत्तापर्यंत 218 पथविक्रेत्यांना कर्ज देण्यात आले आहे.
सध्या रस्त्यावर फिरून व्यवसाय करणारे व्यवसायिक प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून लोकांना स्वावलंबी व सशक्त बनविणे हे पीएम स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या आधारे कोविड 19 काळात बंद पडलेला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मदत उपलब्ध होईल.
या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंत विनातारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्याची पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पथविक्रेत्यांना नव्याने रु.20 हजारापर्यंतचे कर्ज मिळत आहे. यासाठी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.