देवळाली प्रवरात ‘इतना राजकीय सन्नाटा क्यू है भाई?’

की ही वादळापूर्वीची शांतता; मतदारांसह कार्यकर्तेही संभ्रमात
देवळाली प्रवरात ‘इतना राजकीय सन्नाटा क्यू है भाई?’

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची मुदत दि. 26 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर नगरपरिषदेवर प्रशासक येतो, की आहे त्याच नगराध्यक्षांना मुदतवाढ दिली जाते? हे पाहणे महत्वाचे असताना, विरोधी गटात मात्र एकदम शांत वातावरण दिसत आहे. निवडणूक तोंडावर असताना ‘इतना सन्नाटा क्यू है भाई?’ की ही वादळापूर्वीची शांतता आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची मुदत 26 डिसेंबर रोजी संपत आहे. त्या आधी सत्ताधारी गटांनी नवीन प्रभाग रचनेमध्ये काही हस्तक्षेप करू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी प्रभागाचे नकाशे मागविले आहेत. ते शासकीय प्रक्रियेप्रमाणे प्रभागरचना करणार आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार तीन नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. सध्या नऊ प्रभाग असून अठरा नगरसेवक आहेत. मागील वेळेला नगराध्यक्षपद जनतेमधून होते. यावेळी नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

नवीन प्रभाग रचनेनुसार एक ते नऊ प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक व दहा नंबरच्या प्रभागातून तीन नगरसेवक असे एकूण एकवीस नगरसेवक होण्याची शक्यता आहे. यानंतर नगराध्यक्षपद कोणत्या जागेसाठी आहे? याची निवडणुकीनंतर सोडत काढण्यात येईल. यामध्ये जर नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीयसाठी निघाले तर? आणखी पेच निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय मतदारसंघाचा तिढा देखील अजून सुटलेला नाही. काल याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता वाटत होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारला फटकारले आहे. स्थगिती उठविली नाही. या सर्व गुंतागुंती असताना मात्र, निवडणुकीसाठी अनेकजण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले असले तरी विरोधी राजकीय गटात कमालीची शांतता आहे.

नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दीड महिन्यापूर्वी भाजयुमो चा मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुकले. या मेळाव्यात त्यांनी मागच्यापेक्षा शंभरटक्के बहुमताचा दावा केलेला आहे. 2016 ची नगरपरिषदेची निवडणूक माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लढवून यामध्ये नव्याजुन्यांना संधी दिली होती. अठरापैकी सोळा जागा जिंकून नगराध्यक्षपद देखील मोठ्या मत्ताधिक्याने जिंकले. या संधीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सोने करुन विकास कामांचा डोंगर उभा केला. ही जरी सत्ताधारी मंडळींची जमेची बाजू असली तरी दुसरीकडे विरोधकांनी देखील निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे.

भाजपाच्या मेळाव्यानंतर काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला आमदार लहू कानडे व आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीने नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याचा निश्चय व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु या मेळाव्यात नामदार प्राजक्त तनपुरे यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेबाबत कुठलीच चर्चा न केल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर नेतृत्व कोण करणार? याबाबत साशंकता आहे. अजूनही निवडणूक एकत्र लढण्याबाबत त्यांचे एकमत झालेले दिसत नाही. याउलट सत्ताधारी भाजपा कामाला लागला असून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com