निवडणुकीवर डोळा अन् ‘सोशल वॉर’च्या आरोपांचा फुटला ‘पोळा’

देवळालीत कोविड सेंटर, रुग्णवाहिकांवरून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीवर डोळा अन् ‘सोशल वॉर’च्या आरोपांचा फुटला ‘पोळा’

देवळाली प्रवरा (वार्ताहर) / Deolali Pravara - निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने निवडणुकीवर डोळा ठेवून आता सत्ताधारी व विरोधकांचे दोन्हीही गट कोविड सेंटर व रूग्णवाहिकांवरून आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ‘सोशल वॉर’मधून आरोपांचा पोळा फुटला आहे. या एरंडाच्या गुर्‍हाळातून फलनिष्पत्ती नसली तरी नागरिकांची मात्र, औट घटकेची करमणूक होत आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे (Deolali Pravara Municipal Council) सत्ताधारी भाजपा व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात खासगी कोविड सेंटर व भंगार रुग्णवाहिका यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. कोविड महामारीच्या काळात नगरपरिषदेच्या सत्ताधार्‍यांनी नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये कोविडमुळे बाधित झालेल्या रुग्णांसाठी तालुक्यात पहिले खासगी कोविड सेंटर सुरू केले. यामुळे स्थानिकांसह बाहेरील नागरिकांची देखील सोय झाली. अनेक रुग्ण बरेही झाले.

परंतु हे सर्व सुरू असताना कोविडचा फायदा घेऊन सत्ताधारी मंडळींनी पीडित व्यक्तींकडून अव्वाचे सव्वा बील वसूल केल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी शासनाकडे केल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले. परंतु कोविडची येणारी संभाव्य तिसरी लाट डोळ्यासमोर ठेऊन व नागरिकांचे पुन्हा हाल होऊ नयेत, यासाठी याच ठिकाणी नागरिकांसाठी शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मंजुरी घेऊन त्यासाठी नगरपरिषदेने 90 लाख रु. मंजूर केल्याचा ठराव केला.

तर कोविड काळात नागरिकांची लूटमार होऊ नये व त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सत्ताधार्‍यांनी दोन रुग्णवाहिका नगरपरिषदेला दान केल्या. या रुग्णवाहिका भंगार असून त्यांना परिवहन विभागाचा परवानाच नसल्याने राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी टीका विरोधकांनी केली. या सर्वांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी मंडळीनी सोशल मीडियावर ‘लाईव्ह’ कार्यक्रम सुरू केला. तर विरोधकांनी ‘लाईव्ह’ करून सत्ताधार्‍यांना उत्तर दिले. ‘दादा आता तुम्ही बोलाच’ याद्वारे कलगीतुरा सुरू केला. याची दोन दिवसा पासून परिसरात नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे सर्व चार महिन्यांनंतर होणार्‍या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीवर डोळा ठेऊन सुरू असल्याचे जनतेच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे सोशल वॉर करमणुकीचा डाव ठरला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com