देवळाली प्रवरातील ग्रंथालयात 27 हजार पुस्तकांचे संगणकीकरण पूर्ण

ग्रंथ शोधण्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित; तब्बल 65 वर्षे अविरत सेवा
देवळाली प्रवरातील ग्रंथालयात 27 हजार पुस्तकांचे संगणकीकरण पूर्ण

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

देवळाली प्रवरा येथील सुमारे 65 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या ग्रंथालयाचे आता संगणकीकरण करण्यात आले आहे. वाचनालयातील सर्व 27 हजार ग्रंथांना बारकोड करून संगणकीकृत केले असून वाचनालयाचे सर्व कामकाज बारकोड व संगणकाच्या माध्यमातून केले जाते. तसेच वाचनालयातील 27 हजार ग्रंथसंपदा मांडणीसाठी 25 नवीन बुककेस खरेदी करून बारकोड प्रमाणे ग्रंथमांडणी केली आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रंथाला एक निश्चित जागा उपलब्ध झाली आहे. तसेच वाचकांना ग्रंथ शोधण्यासाठी एक ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित केले असून सर्व ग्रंथांची माहिती त्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वाचकांना 27 हजार ग्रंथांमधून अपेक्षित ग्रंथ सहज शोधणे शक्य झाले आहे.

या वाचनालयाची 1956 साली स्थापना झाली. तेव्हापासून नागरिकांना हे ग्रंथालय ग्रंथसेवा देत आहे. महाराष्ट्र शासनाने 1960 साली या वाचनालयास मान्यता दिली. आज या वाचनालयाचा अ दर्जा आहे. 65 वर्षांपासून वाचनालयाची अविरत यशस्वी वाटचाल सुरू आहे.

वाचनालयामध्ये सर्व वर्गातील वाचकांसाठी कथा, कादंबरी, योगशास्त्र, नाटक, स्पर्धा परीक्षा, धार्मिक, ऐतिहासिक, शेती विषयक, कायदेविषयक, पाककला व इतर असे एकूण 27 हजार ग्रंथसंपदा असून विविध नावाजलेली वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व दिवाळी अंक उपलब्ध आहेत. वाचनालयातर्फे नागरिकांना पारायण सप्ताहासाठी ज्ञानेश्वरी व इतर धार्मिक ग्रंथ मोफत उपलब्ध करून दिले जातात. तसेच नागरिकांना वाचनासाठी मोफत वर्तमानपत्रही उपलब्ध करून दिली जातात. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रशस्त व वाचनालयाशी संलग्न अभ्यासिका उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका मोफत सेवा देत आहे.

वाचनालयाच्या तीन मजली प्रशस्त इमारतीमध्ये बालवाचकांसाठी स्वतंत्र बालविभाग व ग्रंथ मोफत उपलब्ध आहेत. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या दूरदृष्टीने व मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी वाचनालय अद्ययावत व संगणकीकृत केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com