
देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
देवळाली प्रवरा येथिल देवळाली श्रीरामपूर जुन्या रस्त्यावरील गावालगत असलेल्या ज्ञानेश्वर ढुस यांच्या वस्तीवर मध्यरात्री बिबट्याने बोकडावर हल्ला करून बोकडाला ठार केले. नागरिकांत दहशत पसरली आहे. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या देवळाली प्रवरा हद्दीमधील श्रीरामपूर रस्ता भागातील चव्हाण वस्ती, ढूस वस्ती, महांकाळ वस्ती आदी परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ज्ञानेश्वर मोहनिराज ढूस यांचे वस्तीवर बिबट्याने पहाटे तीन वाजेच्या जवळपास बोकडावर हल्ला केल्यावर जनावरांच्या ओरडण्याने ढूस कुटुंब जागे झाले.
या कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरड केल्याने बिबट्याने जवळच्या शेतात धूम ठोकली. परंतू तोपर्यंत बोकड गतप्राण झाला होता. ज्ञानेश्वर ढूस, विलास ढुस, संदीप ढुस, व राजेंद्र ढुस हे ट्रॅक्टर घेऊन लांब पर्यंत शेतात बिबट्यामागे त्याला हाकलून लावण्यासाठी गेले असता दोन बिबटे असल्याचे त्यांनी पाहिले.तीन वाजता बिबट्याला फटाके वाजवून पिटाळून लावल्यानंतर एक तासाने पुन्हा बिबट्याने या वस्तीवर जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.