देवळालीत विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या

भरपेठेतील बँकेत काढली मुलींची छेड; चौकीतील पोलीस गायब
देवळालीत विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या

देवळाली प्रवरा (वार्ताहर)

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयास टारगट सडकसख्याहरींनी विळखा घातला आहे. शाळा सुरू होण्या अगोदर व शाळा सुटल्यानंतर टारगटांचा प्रवेशद्वाराजवळ विळखा असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याने पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत देवळाली प्रवरा येथील निष्क्रिय पोलीस कुचकामी ठरले असून राहुरी पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला असून देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकीच बंद करण्याची मागणी केली आहे.

येथील छत्रपती शिवाजी विद्यालय हे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी स्थानिकांसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. याठिकाणी 5 वी ते 10 वी व 11 वी ते 12 वी पर्यंतची शैक्षणिक सुविधा असल्याने व शाळेचा शिक्षक वर्ग चांगला असल्याने शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने या शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी आहेत. त्यामुळे शाळा दोन सत्रात भरते.

सकाळी 7 ते 12 वाजता 5 वी ते 9 वी चे वर्ग भरतात.त्यानंतर 12 ते 5 वाजेपर्यंत 10 ते 12 वीचे वर्ग भरतात. दोन्ही सत्रातील शाळा भरण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी सडकसख्याहरी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर मोठी गर्दी करतात. शाळा सुटल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांची जास्त गर्दी झालेली असते. या गर्दीचा फायदा घेऊन हे टारगट मुलींच्या अंगावर दुचाकी घालणे, मुलींना धक्का मारणे, दुचाकीवर टिबलसीट बसून कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत भरधाव वेगात गर्दीतून दुचाकी चालवणे, चौकाचौकांत थांबून शालेय मुलींना बघून अचकट विचकट टोमणे मारणे, त्यांना बघून अश्‍लिल हावभाव करणे, बर्‍याचदा तर मुलींच्या रस्त्यात दुचाकी आडवी लावून चल गाडीवर बस, अशी धमकीही देण्यात येत आहे.

मुली ज्या दुकानात जातील, त्या दुकानात हे टोळके त्यांच्यामागे जाते व त्यांना त्रास देते. हे टोळकं दिवसभर मुलींच्या मागावरच असते. याबाबत शाळेतील शिक्षकांनी या टोळीला समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही तुम्हाला इथं राहायचे असेल तर नीट रहा, नाहीतर तुमचा देखील बंदोबस्त करू, तुम्हाला आमची ताकद माहीत नाही, असा दम दिला जात आहे. विद्यालयातील बहुतांश शिक्षक व शिक्षिका हे बाहेरगावातून येत असल्याने ते देखील यांच्या दहशतीखाली आहेत. याबाबत पालकांची व टारगटांची अनेकदा झटापट झाली आहे.

मात्र, यांचे संख्याबळ जास्त असल्याने मुलीची बाजू असल्याने नको झंझट म्हणून पालकांनी देखील अनेकदा नमते घेतले. परंतु यामुळे या सडकसख्यहरींचे फावले गेले आहे. त्यांचे नित्याचे प्रकार रोज वाढत आहेत. याबाबत पालकांनी अनेकदा पोलीस चौकीत जाऊन लेखी व तोंडी तक्रार केली आहे. अनेकदा तक्रार द्यायला जाताना पोलीस चौकीच बंद असल्याने पालकांच्या सहनशीलतेचा बांध आता तुटला आहे. याबाबत तातडीने पोलीस प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन टारगटांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com