देवळाली प्रवरात आठ ठिकाणी घरफोडी

पंधरा जणांच्या टोळीचा देवळालीत रात्रभर धुमाकूळ
देवळाली प्रवरात आठ ठिकाणी घरफोडी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

देवळाली प्रवरा (Deolali Pravara) शहरात शनिवारी रात्री दहा ते पंधरा चोरांच्या टोळीने आठ ठिकाणी घरफोडी (Burglary) करुन सोने, चांदीसह (Gold, silver) रोकड असा एकूण 1 लाख 36 हजाराचा ऐवज लुटून नेला. या घटनेमुळे देवळालीचे नागरिक भयभीत झाले आहेत. तालुक्यात चोर्‍यांचे (Thieves) सत्र वाढल्याने राहुरी पोलिसांची (Rahuri Police) निष्क्रियता चव्हाट्यावर आली असून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (PI NandKumar Dudhal) या अधिकार्‍याची बदली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चोरट्यांनी देवळाली प्रवरात रात्रभर धुमाकूळ घातला. मात्र, रात्रीच्या गस्तीवरील एकही पोलीसदादांना या चोर्‍यांचा सुगावा लागला नाही. सकाळी नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस खाते खडबडून जागे झाले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 50 हजार लोकसंख्या असलेल्या शहरात रात्रीच्या गस्तीवर अवघ्या एका पोलिसाची नेमणूक केली जाते. देवळाली येथे पोलीस चौकी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

शहरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत दहा ते पंधरा जणांच्या चोरट्यांच्या टोळीने रात्रभर धुमाकूळ घातला. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक अच्युत नांदुर्डीकर यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यातील कपाटे व सामानाची उचकापाचक करुन मोठा ऐवज नेला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदुर्डीकर सध्या त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास आहेत. चोरी झाल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत ते उपस्थित न झाल्याने नेमका किती ऐवज गेला? हे समजू शकले नाही. चोरट्यांनी शेजारील बंद बंगल्याचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. मात्र, चोरट्यांची तेथे निराशा झाली.

काही महिन्यापूर्वीच बंगल्याचे मालक सेवानिवृत्त शिक्षक विलास पवार हे लाख ता.राहुरी येथे शेतात राहण्यासाठी गेले.त्यामुळे बंगल्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या बंगल्यापासून जवळच असलेल्या सोमनाथ पठारे यांच्या बंगल्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. पठारे हे शनिवारी सकाळी कुटुंबासह पुणे येथे गेले होते. पुण्यावरुन ते कोल्हापूर येथे जाणार होते. पठारे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी उचकापाचक करुन सामानाचा ढिग घालून ठेवला होता. कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. पठारे यांच्या बंगल्यातील शौचालयाचा वापर यावेळी चोरट्यांनी केला.

येथून चोरट्यांनी आपला मोर्चा अमित सुरेश अंबिलवादे यांच्या दुकानाकडे वळविला. त्यांच्या सराफी दुकानाचे कुलूपे तोडून दुकानातील 750 ग्रॅम चांदी व दुरुस्तीला आलेले दागिने असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. शेजारीच राहणार्‍या शिरीष लोखंडे या शिक्षकाच्या बंद घराचे कुलप तोडून मोठा ऐवज नेला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे शिक्षक दाम्पत्य सुपा येथील घरी गेले असल्याने नेमका किती ऐवज गेला? हे समजू शकले नाही. या दुकानात चोरी करण्यापूर्वी कटारीया यांच्या बंगल्याच्या गेटमधून बॅटरी लावून पाहिले. त्याचवेळी कटारीया यांच्या किराणा दुकानासमोर आठ ते दहा चोरटे उभे असल्याचे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले. पाठीवर सॅक लटकविलेल्या व तोंडाला काळे फडके बांधलेल्या अवस्थेत सीसीटिव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे.

या ठिकाणाहून खांदे गल्लीतील आनंद देसर्डा यांचे साई आनंद किराणा या दुकानाचे कुलपे तोडीत असताना जवळच असलेल्या काका मिसाळ यांनी घराच्या छतावरुन पाहिले. काका मिसाळ यांनी संतोष मुथा यांना फोन करुन दुकान फोडीत असल्याची माहिती दिली. मुथा यांनी आनंद देसर्डा यांना फोन करुन चोरीची माहिती दिली.आनंद देसर्डा यांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी चोरटे सेंटरलॉक उघडीत होते. देसर्डा यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. यावेळी देसर्डा यांना चार ते पाच चोरटे दुकानामागील शेतात पळून गेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी शेतातून निवृत्ती खांदे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. घराचा मागील दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटांची उचकापाचक करत कपाडातील 3 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली.

चोरट्यांनी श्रीरामपूर रस्त्यालगत (Shrirampur Raod) रेणुका पंपाजवळील मगबूल गफूर पटेल यांच्या घराची आतील बाजूने लावलेली कडी गजाच्या साह्याने उघडून पटेल झोपलेल्या पलंगास चोरट्यांनी वेढा दिला. एकाच्या हातात हत्यार व एकाच्या हातात पिस्तुल असल्याचे त्यांनी पाहिले. चोरट्यांनी हिंदी भाषेतून कपाटाच्या चाव्या मागितल्या. कपाट उघडेच आहे, असे सांगितल्यावर दोन चोरट्यांनी कपाटाची उचका पाचक करुन 15 हजाराची रोख रक्कम चोरली. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पटेल यांचा मुलगा अमजद ज्या खोलीत झोपला होता, त्या खोलीच्या दरवाजाची बाहेरुन कडी लावून घेण्यात आली होती.

घरात कोणीतरी शिरल्याचा संशय आल्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा बाहेरुन लावलेला असल्याने अमजद पटेल याने शेजारी राहणारे युनूस शेख यांना फोन लावून चोरांची माहिती दिली. युनूस शेख व त्यांचे दोन बंधू बाहेर आले. चोरांच्या मागे पळू लागले असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडाचा वर्षाव केला. अचानक दगड समोर पडू लागल्याने शेख बंधू मागे फिरले. चोरटे श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीकडे पळाले. त्या ठिकाणी चोरट्यांचा टेंपो उभा होता.

अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्यानंतर सकाळी ठसेतज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले. ठसेतज्ज्ञ प्रमुख पांडुरंग फंड, पो.कॉ. एम. आर. खरपुडे यांनी घरफोडीच्या ठिकाणी ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी हॅण्डग्लोज घालून घरफोड्या केल्याने कोणत्याही ठिकाणी ठसे मिळून आले नाही. दरम्यान श्वानपथकास पाचारण करण्यात आले. मिस्का नावाच्या श्वानाने पठारे, नांदुर्डीकर, पवार यांच्या बंगल्यापासून शिरीष लोखंडेपर्यंत माग काढला. लोखंडे यांच्या घरातून मागील दरवाजाने अब्दुल हमीद चौकातून विटभट्टी मार्गे देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर फूटरस्त्याने ओढ्यापर्यंत माग काढला. मगबूल पटेल यांच्या दारात चोरट्याची चप्पल राहिली होती.

श्वानास त्या चपलेचा वास दिला असता श्वानाने श्रीरामपूर रस्त्याने चव्हाण वस्तीपर्यंत माग काढला. या वस्तीवरील एका महिलेने पहाटे 4 वाजता येथे एक टेंपो उभा होता. असे पोलिसांना सांगितले. पहाटे 4 वाजता नगर-मनमाड (Nagar-Manmad Road) व श्रीरामपूर रस्त्यावर (Shrirampur Road) नाकेबंदी केली असती तर चोरटे पोलिसांना अलगद सापडले असते. परंतु गस्तीवरील पोलिसांना घरफोडीची (Burglary to police) घटना सकाळी 7 वाजता समजली. यावरुन गस्तीवरील पोलीस खरंच गस्तीवर होते का? देवळाली प्रवरा पोलीस (Deolali Pravara Police) चौकीत सात पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.परंतु एकही पोलीस चौकीवर थांबत नाही. घरफोडीच्या ठिकाणी एका वाळू एजंटने तर या पोलीस चौकीतील एक पोलीस गस्तीवर असल्यावर गस्त घालण्याऐवजी नदीचा पट्टा व वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवून असतो. वाळूची गाडी पकडून रात्रीच तोडपाणी करुन सोडून दिली जाते, अशी माहिती दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com