देवळाली प्रवरात घराच्या हद्दीवरून मारहाण

पाचजण जखमी; चारजणांवर गुन्हा दाखल
देवळाली प्रवरात घराच्या हद्दीवरून मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

घर आमच्या हद्दीत बांधले असून ते जेसीबीने पाडून टाकू, अशी धमकी देत देवळाली प्रवरा येथील चव्हाण कुटुंबियांना लोखंडी गज व कोयत्याने मारहाण करण्यात आली. यात पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वैशाली सतीश चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना देवळाली प्रवरा येथे चव्हाण वस्तीवर शुक्रवार दि. 17 जून रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या मारहाणीत राजेंद्र चव्हाण, संजय चव्हाण, मंदा चव्हाण, वैशाली चव्हाण, मिना चव्हाण हे जखमी झाले आहेत.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत वैशाली चव्हाण यांनी म्हटले, आम्ही एकत्र कुटुंबात रहात असून आमच्या शेजारी आमचे चुलत सासरे सोपान दादा चव्हाण यांची जमीन व राहते घर आहे. आमचे नेहमी शेताच्या बांधावरून वाद होतात. दि. 17 जून रोजी दुपारी 2 वाजता माझे घरातील सर्वजण घरासमोर असताना सोपान दादा चव्हाण, जालिंदर सोपान चव्हाण, बाबासाहेब सोपान चव्हाण, रा. देवळाली प्रवरा, राहुल अडसुरे रा.वरवंडी हे आले. आमची शेती तुमच्याकडे निघत असून तुमचे घर आमच्या हद्दीत येत आहे. ते आम्ही एखाद्या दिवशी जेसीबीने पाडून टाकू, असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावर माझे दीर राजेंद्र चव्हाण त्यांना म्हणाले, आमचे घर आमच्याच हद्दीत बांधलेले आहे. हे समजावून सांगितल्याचा राग आल्याने सोपान चव्हाण याने राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्यांना जखमी केले.

तसेच बाबासाहेब चव्हाण याने संजय चव्हाण व मंदा चव्हाण यांना लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. जालिंदर चव्हाण याने मिना चव्हाण हीस लोखंडी गजाने मारून जखमी केले. तर राहुल अडसुरे याने मला लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली.

याप्रकरणी सोपान दादा चव्हाण, जालिंदर सोपान चव्हाण, बाबासाहेब सोपान चव्हाण, राहुल अडसुरे या चारजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं. 0508, भादंवि. कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com