
अहमदनगर (प्रतिनिधी) - अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिला पळून चल, नाहीतर मी आत्महत्या करेल, अशी धमकी देणार्या तरूणाविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश रावसाहेब उमाप (वय 20 रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. शहरातील सावेडी उपनगरात हा प्रकार घडला.
प्रकाश उमाप याने सावेडीतील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्या मुलीने उमाप याला नकार दिला असता त्याने पिडीतेच्या घराजवळ येवून गाडीचा हॉर्न व शिट्टी वाजवून तसेच तिचा पाठलाग करून मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी उमाप याने पिडीतेला फोन करून माझ्यासोबत पळून चल अन्यथा मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. तसेच पिडीत मुलीच्या भावाला आरोपी उमाप याने शहरातील दिल्लीगेट याठिकाणी बोलावून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी उमाप विरोधात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहे.