डेंग्यू, मलेरियाबाबत आरोग्य विभाग सतर्क

झेडपीकडून करोना लसीकरणाचा आढावा
डेंग्यू, मलेरियाबाबत आरोग्य विभाग सतर्क

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांशी लढण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे, तसेच करोनाच्या लसीकरणाला गती देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे आरोग्य यंत्रणेला दिल्या.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरूवारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या 98 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, तालुकास्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी, तसेच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांना स्वाईन फ्लू, कुष्ठरोग शोध मोहीम, सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेचे प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने कोविड लसीकरण, किटकजन्य आजार (डेंग्यू, चिकुनगुणिया), राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह करोना प्रतिबंध लसीकरणाला गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. राजेंद्र खंडागळे, डॉ. रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. भागवत दहिफळे, डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. मोहन शिंदे, डॉ. सुवर्णमाला बांगर, डॉ. रविंद्र कानडे, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चेतन खाडे उपस्थित होते. यावेळी नव्याने पदोन्नती झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. संदीप पुंड, डॉ. सविता ससाणे यांचा मॅग्मो संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com