लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत असतानाही ते भारतरत्न पुरस्काराने उपेक्षित राहिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली जनसामान्यांची ही मागणी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडवणीस सरकार यांनी याबाबत एकमुखी निर्णय घेऊन अण्णाभाऊंच्या जयंती निमित्ताने भारतरत्न देऊन तमाम जनतेची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी बहुजन समाजाकडून होत आहे.

फडवणीस सरकारच्या काळातही भारतरत्न देण्यासाठी अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक आमदार, खासदार, विविध क्षेत्रातील नेते मंडळींनी लेखी निवेदनाद्वारे ही मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ती मागणी अपूर्णच राहिली. आता केंद्रात मोदी व राज्यात शिंदे-फडवणीस सरकार हे एका विचाराचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या समाजप्रबोधनासाठी महान कार्य करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन महाराष्ट्राबरोबरच देशवासीयांची अनेक वर्षाची ही मागणी पूर्ण करावी.

मागील सरकारच्या काळात जे झाले असेल ते झाले असेल मात्र नव्याने नियुक्त झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे अनेक वेळा महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणाचा गाडा चालवतात. मग महान समाजसुधारक ज्यांनी परदेशात जाऊन समाजपरिवर्तन केले अशा अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी विलंब का होतो हे यानिमित्ताने जनतेतून मागणी होऊ लागली आहे.

येणार्‍या 1 ऑगस्ट 2022 या जयंतीच्या अगोदरच अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन महाराष्ट्राबरोबरच देशवासियांची ही मागणी पूर्ण करावी, अशी मागणी बाळासाहेब बागुल, रामभाऊ पिंगळे, समीर वीर, परशुराम साळवे, मजाबापू साळवे, नंदू आरणे, प्रा. रघुनाथ खरात, सुरेश अडांगळे, संजय वालेकर, दगडू साळवे, जगनाथ आव्हाड, संतोष भडकवाड यांच्यासह विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे, निलेश सरोदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, आरपीआयचे प्रदीप बनसोडे, लोकस्वराज्य आंदोलनाचे अ‍ॅड. नितीन पोळ यांच्यासह अनेक संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खा. सुजय विखे यांना पुढाकार घेण्यास भाग पाडू- कैलास कोते

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान असून ते कोणत्याही एका विशिष्ट समाजासाठी नव्हते. त्यांची परिवर्तनाची लाट ही तमाम महाराष्ट्राच्या व देशवासीयांच्या हितासाठी होती. यामुळे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी खा. सुजय विखे यांना समक्ष भेटून केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू, असे कैलासबापू कोते यांनी म्हंटले आहे.

अण्णाभाऊंचे कार्य राजकारणाच्या पलीकडं असल्यामुळे त्यांनी कोणतेही विशिष्ट पक्षासाठी काम न केल्याने या पुरस्काराची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी शरद पवार साहेब यांना पुढाकार घेण्यास भाग पाडू.

- निलेश कोते, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com