स्वस्त धान्य वाटप वाडीवस्तीवर करा; आदिवासी जनतेची मागणी

स्वस्त धान्य वाटप वाडीवस्तीवर करा; आदिवासी जनतेची मागणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आंबित येथील वाड्या वस्त्यांवर स्वस्त धान्य दुकान सुरू करावे, अशी मागणी

अंबितचे सरपंच मनोहर पथवे यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांचेकडे केली आहे.

आंबित सारख्या अतिदुर्गम भागातील गावात अनेक वाड्या आहेत. सुमारे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाड्यांचे अंतर आहे. आंबित घाटातील हेंगाडवाडी ते आंबित या गावांना जोडणार्‍या घाटातून डोक्यावर स्वस्त धान्य घेऊन जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

हेंगाडवाडी, दाभाचीवाडी, पायळीची वाडी, कळकीची वाडी येथील लोकांना आंबित घाटातून तसेच नाला ओलांडून पाच ते सहा किलो मिटर अंतर पायी चालत अंबित गावात येऊन स्वस्त धान्य दुकानातून धान्य घ्यावे लागते.

करोनामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घरातच थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.आमली घाट ओलांडून नदीतून पलीकडे जावे लागते. तेव्हा कुठे स्वस्त धान्य मिळते. सरकारने आम्हा गरिबांना जगण्यापुरते धान्य वाडीतच मिळेल अशी सोय करून द्यावी, अशी मागणी हेंगाडवाडीच्या पुनाबाई पथवे यांनी केली आहे.

रोजगारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही मोठे कुटुंब असल्याने पोट भरणे देखील आज स्वस्त राहिले नसल्याचे चित्र आहे.

दोन वर्षे झाली, प्रशासनाशी संपर्क करत आहे. स्वस्त धान्य वाडी वस्ती वरच सुरू करावे यासाठी सरपंच मनोहर पथवे व वाडी वस्तीवर राहणार्‍या ग्रामस्थांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन स्वस्त धान्याचे वाटप हे येथील वाडी वस्तीवर करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

आंबित सह वाडी वस्तीवर राहणार्‍या आदिवासींना धान्यासाठी आता पायपीट करावी लागणार नाही. संबंधित वाडीतील लोकांना पुढील महिन्यांपासून जानेवाडी येथेच स्वस्त धान्य उपलब्ध करून देणार आहोत. दुकानदार व सरपंच यांना बोलावून तसे नियोजन केले जाईल.

- मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com