पैशाची मागणी करीत मृतदेह नेण्यास रूग्णवाहिका चालकाचा नकार

वांबोरीतील घटना; दिवसभर करोनाबाधिताचा मृतदेह रूग्णालयातच राहिला
पैशाची मागणी करीत मृतदेह नेण्यास रूग्णवाहिका चालकाचा नकार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मयत करोना रुग्णाच्या नातेवाईकांची ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांकडून पैशासाठी अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला असून काल सकाळी 8.45 वाजता मृत घोषित केलेल्या रुग्णाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेठीस धरण्यात आल्याचे उघड झाले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब (तांबेवाडी) येथील एका व्यक्तीच्या कुटुंबात मुलगी सोडून कोणी नातेवाईक नसल्याने व मुलगी तांदुळवाडी येथे असल्याने ती व्यक्ती तांदुळवाडी येथे राहत असताना करोना झाला. मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य देखील पॉझिटिव्ह असल्याने सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असताना या साधारण 62 वर्षीय व्यक्तीचे वांबोरी ग्रामीण रुग्णालयात सकाळी 8.45 वाजता निधन झाले.

परंतु मुलगी, जावई पॉझिटिव्ह असल्याने दूरचे दोन नातेवाईक अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. मात्र, रुग्णवाहिका चालक तसेच रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांनी अंत्यविधी वांबोरी येथेच होईल. परंतु यासाठी 12 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणी सदस्य नाही व मुलीच्या घरातील सर्वजण पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत आहेत, असे सांगूनही त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

त्यानंतर इतर ठिकाणची दुसरी करोना पॉझिटिव्ह व्यक्ती मयत झाली असताना त्यांनी पैशांची मागणी पूर्ण केल्याने त्यांच्या व्यक्तीची त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या दूरच्या नातेवाईकांनी पत्रकारांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पत्रकार दत्तात्रय तरवडे यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर पत्रकार तरवडे यांनी वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. पाठक व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब चक्र फिरवून रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिकाचालकांनी माघार घेत 6 हजार रुपये खर्चात अंत्यविधी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, या घटनेमुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतर देखील किती नरकयातना भोगाव्या लागत आहेत, हे समोर आले आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका चालक व डॉक्टर रुग्णांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com