कोपरगाव पाणी योजनेची मागणी केल्याने निळवंडे जिरायत भागातून संताप

कोपरगाव पाणी योजनेची मागणी केल्याने निळवंडे जिरायत भागातून संताप

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी टापूला वरदान ठरणार्‍या निळवंडेच्या कालव्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. ल़ाभक्षेत्रातील जिरायत भागाला पाणी मिळण्याआधीच या पाण्यात लाभक्षेत्राबाहेरचे वाटेकरी तयार होत आहेत.गेल्या दीड दोन वर्षापासून थंड बस्त्यात असलेला निळवंडे शिर्डी कोपरगाव पाईपलाईऩचा विषय साई संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ आल्यावर कोपरगावमधून जोर धरत आहे.गोदावरी कालव्यांचे पाणी उपलब्ध असताना कोपरगावच्या सर्वपक्षीय मंडळाने साई संस्थानकडे निळवंडेतून पाणी आणण्याची मागणी केल्याने जिरायत भागातून संतापाची लाट उसळली आहे.

विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी निळवंडे धरणातून पिण्याच्या नावाखाली पाणी पळविण्याची स्पर्धाच सुरू झाली होती. सुरुवातीला साई संस्थान, शिर्डी नगरपरीषद त्यांनतर कोपरगाव नगरपालिका यांचा यात सहभाग होता. विशेष बाब म्हणजे या सर्व संस्थांना गोदावरी खोर्‍यातील धरण समूहातून कालव्यांद्वारे पाणी मिळत आहे. मात्र विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतपेटी डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सत्तेचा फायदा घेत आहे. लाभक्षेत्राबाहेरील या तिनही ठिकाणी पाणी गेल्यास पाच हजारांवर सिंचन क्षेत्र कमी होणार आहे.

मुळातच गोदावरी कालव्यांचे पाणी मिळत असूनही वर्षानुवर्ष वंचित भागासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळण्याच्या आधीच लाभक्षेत्राबाहेर पाणी पळविण्याच्या प्रयत्नामुळे जिरायत लाभक्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. साई संस्थानवर कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळताच कोपरगावच्या सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत नव्याने मागणी केल्याने निळवंडे जिरायत भागातून उलटसुलट चर्चा होत आहे.

सध्या सरकार बदलले असून राज्यातील आघाडी सरकारमध्ये निळवंडे लाभक्षेत्रातील महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे असे दोन मंत्री आहेत.त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांचा विरोध डावलून लाभक्षेत्रातील शेतीचे पाणी लाभक्षेत्राबाहेरील शहरांना पिण्याच्या नावाखाली जाणार का? मंत्री याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

निळवंडेला विरोध करणारांना व पाणी पळविण्याचा घाट घालणार्‍या पुढार्‍यांनां लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी गेल्या निवडणुकीत अद्दल घडविली आहे.मात्र अद्यापही त्यांच्या कुरघोड्या थांबलेल्या दिसत नाही. वास्तवीक पाहता गोदावरी धरण समुहातून पाणी मिळत असतानाही वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहणार्‍या जिरायत शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी लाभक्षेत्राबाहेर पळविण्याचा डाव निळवंडे पाटपाणी कृती समिती यशस्वी होऊ देणार नाही प्रसंगी यासाठी आम्ही शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरू.

- श्री. नानासाहेब शेळके अध्यक्ष, निळवंडे पाटपाणी कृती समिती

Related Stories

No stories found.