अहमदनगर : मागणी 60 हजार अन् मिळाले 6 हजार क्विंटल बियाणे

खरीपाची तयारी : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून हंगामाची पूर्व तयारी बैठक
अहमदनगर : मागणी 60 हजार अन् मिळाले  6 हजार क्विंटल बियाणे
बियाणे

अहमदनगर (प्रतिनिधी) - यंदाच्या खरीप हंगामाची पूर्वतयारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यासाठी 60 हजार 392 क्विंटल बियाण्याची, तर अडीच लाख मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यातून दहा टक्के म्हणजे 6 हजार 420 क्विंटल बियाणे, तर पन्नास टक्के खते उपलब्ध झाली आहेत. उर्वरित बियाणे आणि खतांचा लवकरच पुरवठा होण्याचा विश्‍वास जिल्हा परिषद कृषी विभागाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या राज्यात करोनाचे संकट आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्ह्यात सर्व शेतकर्‍यांना कृषीविषयक बाबींचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी एकूण 60 हजार 392 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यातून आज अखेर 6 हजार 420 क्विंटल बियाणाचा पुरवठा झालेला आहे. त्यामध्ये कापूस बियाण्यासाठी 5 लाख 25 हजार 476 पाकिटे (प्रत्येकी 450 ग्रॅम) एवढा कोटा मंजूर झाला आहे. त्याची प्रत्यक्ष विक्री शेतकर्‍यांना 1 जूननंतर करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एकूण 2 लाख 55 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून त्यातून 2 लाख 11 हजार मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. आज अखेर 1 लाख 26 हजार टन खत उपलब्ध झाले आहे. यापैकी 31 हजार 285 टन खताची विक्री झाली असून 94 हजार 800 मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकर्‍यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी. खत वितरकांनी पॉस मशिनच्या साह्याने खते वितरित करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.

.............

युरियाची मोठी मागणी

शेतकर्‍यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुषंगाने 1 लाख 5 हजार 869 मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून त्यातून 81 हजार 910 मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून 8 हजार 949 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे.

....................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com