
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
यंदा दमदार पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टवर प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी पिकाचे नियोजन असून ज्वारीचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर तर हरभरा पिकाचे क्षेत्र 1 लाख 30 हजार आणि गहू पिक 99 हजार 999 हेक्टर नियोजित आहे. हंगामासाठी 48 हजार 634 क्विंटल बियाणाची गरज असून कृषी यासाठी नियोजन करत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात देखील दमदार पावसामुळे 6 लाख 40 हजार हेक्टरवर सरासरीच्या 110.51 टक्के पेरण्या झालेल्या आहे.
अतिरिक्त पावसामुभे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी जादाच्या पावसामुळे पिकांची केवळ वाढ झाली असून त्यांना शेंगांची लागण कमी असल्याचे दिसत आहे. यात सोयाबीन, कापूस, चारा पिके, अकोल्यात भात, भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलेला आहे. दुसरीकडे आता कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. नगर जिल्हा हा राज्याच्या कृषीच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात परतीच्या पावसावर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची मदार असते.
काही वर्षापासून जिल्ह्यातील पावसाचा चित्र बदलत आहे. जून ते सप्टेंबर या कालवधीत जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला आहे. पावसाने देखील सरासरी ओलांडली असून अजून काही दिवस परतीच्या पावसाचे असल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. मात्र, यंदा सर्व पाणीच पाणी असल्याने रब्बी हंगामासाठी शेतकर्यांचा आशा वाढल्या आहेत. यामुळे कृषी विभाग आता रब्बी हंगामाच्या नियोजनात गुंतला असून 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र हंगामासाठी प्रस्तावित केले आहे.
यात रब्बी ज्वारीचे 3 लाख 49 हजार, गहू 99 हजार 999, मका 3 हजार 500, हरभरा 1 लाख 30 हजार, सुर्यफूल 700, ऊस लागवड 57 हजार 33 हेक्टरचा यांचा समावेश आहे. यासह 1 लाख 62 हजार 875 क्षेत्रावर भाजीपाला, 12 हजार 189 क्षेत्रावर फळपिके, 457 क्षेत्रावर फुल शेती यासह 1 लाख 75 हजार 521 हेक्टवर अन्य पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे रब्बी हंगामासह अन्य शेतपिकांसह कृषी विभागाने 8 लाख 16 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 48 हजार 634 क्विंटल बियाणांची गरज असून यात 17 हजार 576 सार्वजनिक आणि 31 हजार 58 क्विंटल खासगी कंपन्याकडून बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. यातही एकट्या महाबीजकडून 15 हजार 26 क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे.
असे आहे बियाणांचे नियोजन
ज्वारी 8 हजार 7 क्विंटल, गहू 15 हजार 918 क्विंटल, हरभरा 15 हजार 562 क्विंटल, सुर्यफूल 8 क्विंटल, करडई 32 क्विंटल आणि मका 9 हजार 107 क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.