घुलेवाडी |वार्ताहर| Ghulewadi

घुलेवाडी फाटा येथे एका चार मजली इमारतीचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. याठिकाणी असलेल्या सार्वजनिक बाकड्यावर

ठेकेदाराने खडी आणि दगडी कच टाकली आहे. याबाबत नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

घुलेवाडी फाटा येथे एका विद्यार्थी निवासाचे नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम रात्र आणि दिवसा युद्धपातळीवर सुरू आहे मात्र बांधकाम करणार्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी संगमनेर पंचायत समितीमार्फत ठेवलेल्या बाकड्यावरच बांधकामासाठी लागणारी खडी आणि दगडी कच टाकली आहे. त्यामुळे बाकड्यांचे नुकसान झाले आहे.

संगमनेर पंचायत समिती सदस्या सुनंदाताई जोर्वेकर यांच्या सन 2018-19 सेस निधी अंतर्गत आणि माजी सदस्य सुनील राऊत यांच्या 2013-14 निधीतून हे बाकडे (बेंच) घुलेवाडी फाटा येथे रिक्षा आणि एस टी बस थांबा असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन देण्यात आले आहे.

अशी बाकडे अनेक सार्वजनिक ठिकाणी दिलेली आहेत. त्यांचीही अवस्था यानिमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे .मात्र सदर ठिकाणी बांधकाम ठेकेदाराने निष्काळजीपणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय केली आहे. सदर बांधकाम ठेकेदारावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामांकरिता निधी येतो. विविध कामे मार्गी लावली जातात. सार्वजनिक साहित्यांमध्ये हायमॅक्स, बाकडे (बेंच), शवदाहिनी ही सेस निधीतून दिली जातात. हे साहित्य देतेवेळी ग्रामपंचायत लिहून देते की, या साहित्याची देखभाल आम्ही करू, मात्र सध्या घुलेवाडीतील सार्वजनिक साहित्यांची दुरवस्था बघितल्यावर ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचे दिसून येते. घुलेवाडी फाटा येथे ठेवण्यात आलेले बाकडे (बेंच) बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नादुरुस्त झाले आहेत. त्यावर ग्रामपंचायतीने कायदेशिर कारवाई केली पाहिजे.
- सुनील राऊत, माजी पंचायत समिती सदस्य, संगमनेर