शाळांचा दिल्ली पॅटर्न नगरमध्ये राबविणार

शाळांचा दिल्ली पॅटर्न नगरमध्ये राबविणार
संग्रहित

अहमदनगर l प्रतिनिधी l Ahmednagar

दिल्ली शाळाभेटीला गेलेल्या नगरच्या शिष्टमंडळाने तेथील नाविन्यपूर्ण संकल्पना शहरातील शाळांमध्ये राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यामुळे शाळांचा दिल्ली पॅटर्न लवकरच नगरमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

शहरातून दिल्ली येथील शाळांमध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत अभ्यास करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रात घडवलेल्या बदलांबाबत चर्चा केली.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, पर्यवेक्षक बाळासाहेब साळुंके, उपशिक्षक इम्रान तांबोळी, विषयतज्ञ शिक्षक अरुण पालवे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

शिष्टमंडळाने या भेटीत सिसोदिया यांच्याशी नवनवीन शैक्षणिक बाबी व शैक्षणिक धोरणावर चर्चा केली. सिसोदिया यांनी दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात बदल घडविताना राबवलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. त्यातील काही ठळक उपक्रम असलेले आनंदी शिक्षण, प्रेरक शिक्षक पालक समुपदेशन, प्रेरणादायी कथा, बुनियादी शिक्षण, बहू कौशल्य आधारित शिक्षण, पालक शिक्षकांचे महामेळावे, शाळा तेथे व्यवस्थापक आदी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.

दिल्ली शाळेच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाने तेथील शहीद हेमू कलानी विद्यालय, लाजपत नगर सर्वोदय विद्यालय, मोतीबाग २, सर्वोदय विद्यालय, रोझ ॲवेन्यू नवी दिल्ली आदी विद्यालयांना समक्ष भेटी देऊन विद्यालयातील मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक यांच्याशी संवाद साधून तेथील उपक्रमांची व झालेल्या बदलांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्या शाळांमधील उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व गुणवंत विद्यार्थी यांनी आपले अनुभव सांगितले.

Related Stories

No stories found.