शिष्टमंडळ पुन्हा पवारांकडे जाणार
सार्वमत

शिष्टमंडळ पुन्हा पवारांकडे जाणार

आ. निलेश लंके : बाधित क्षेत्रातील शेतकर्‍यांना आश्वासन

Arvind Arkhade

पारनेर |प्रतिनिधी|Parner

राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यांतील 23 गावांवर आलेले संकट व त्यामुळे अस्थिर झालेल्या शेतकर्‍याच्या नजरा पुन्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे लागल्या आहेत. तिनही तालुक्यांतील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन पवारांच्या भेटीला जाणार असल्याचे, आ.निलेश लंके यांनी सांगितले आहे.

रविवारी के.के. रेंजच्या अधिकार्‍यांच्या पारनेर तालुक्यातील गावांतील पाहणीनंतर काल सोमवारी तालुक्यातील शेतकर्‍यांनी आ. लंके यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली. त्यांनी गेल्या जानेवारीत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली होती. के. के. रेंज संदर्भात देशाचे संरक्षण मंत्री यांची भेट निश्चित झाली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे संरक्षण मंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु या संदर्भातील सर्व माहिती आ.लंके यांनी पवार यांच्याकडे सुपूर्द केली होती.

दरम्यान, काल आ. लंके यांनी जमलेल्या शेतकर्‍यांना संबोधताना पारनेर तालुक्यातील के. के. रेंज संदर्भात खा.पवार यांना सर्व माहिती आहे. ज्यावेळी हे सर्व्हेक्षण झाले होते. त्यावेळी हे क्षेत्र पडीक व माळरान जिरायत होते.

शेतकर्‍यांनी या ठिकाणी बँका, सोसायटीचे कर्ज काढून हे क्षेत्र विकसित केले. तसेच या परिसरात मुळा धरण, काळूचे धरण असून त्यांना देखील लष्काराच्या विस्तारिकरणाचा धोका बसू शकतो. राजस्थानसारख्या ठिकाणी लाखो एकर क्षेत्र पडीक आहे, सरकारने त्या क्षेत्राकडे लक्ष द्यावे, पारनेर तालुक्यातील हे सुलतानी संकट टाळावे, यासाठी लढा देण्याचे आश्वासन आ. लंके यांनी दिले.

पारनेर तालुक्यात 1 हजार बेडचे कोव्हीड केअर सेंटरचा शुभारंभ टाकळी ढोकेश्वर येथे होत आहे. तो झाल्यावर आठ दिवसात खा. पवार यांच्या माध्यमातून संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या या के.के. रेंजच्या विरोधात तिनही तालुक्यातील शिष्टमंडळ घेऊन खा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आ. लंके यांनी स्पष्ट केले.

यावेळी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, अण्णा सोडणार, नारायण तमनर, साईनाथ कदम, बापू जगताप, रामदास बाचकर, अण्णा खिलारी, नवनाथ कोळसे, गणेश हाके, अरीफभाई शेख, अण्णा डुकरे, सचिन माळवदे, बाळासाहेब गागरे, शिवाजी कोळसे, जालिंदर अडसुरे, योगेश पठारे यांच्यासह बाधीत शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com