खरवंडी कासार (वार्ताहार) -

पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील शेतकर्यांनी पाऊस चांगला झाल्यामुळे कृषी विभागाच्या मनरेगा कृषी फळबाग योजनेअंतर्गत

अर्ज भरले होते. कृषी समन्वयक ग्रामीण कृषी मजूर यांनी संबंधित जागेची पाहणी करून फोटो काढून फॉर्म नंबर 4 भरून घेत कृषी विभाग महाडीबीटी या वेबसाईटवर माहिती भरली तद्नंतर अवकाळी पाऊस शेतातील चिखल आदी कारण देत कृषी समन्वयक यांनी फळबागा लागवडीच्या जमिनीची पाहणी करण्यास नकार देत व प्रती शेतकरी तीन हजार रुपये याप्रमाणे फळबागा मंजुरीसाठी मागितल्याचा आरोप लाभार्थी शेतकर्यांनी केला आहे.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषीमंत्री दादा भुसे अहमदनगर जिल्हा कृषी अधिकारी पाथर्डी तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे पाथर्डी तालुक्यातील भालगाव कृषी मंडलातील कृषी समन्वयक बोरुडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भालगावचे शेतकरी गणेश सुपेकर म्हणाले, मनरेगा कृषी फळबाग योजनेअंतर्गत भालगावातील 17 शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवेदन केले होते. शेतकर्यांनी लाखो रुपये खर्च करून फळबागा लावून जगवण्याचे काम केले आणि आता मनरेगा निकषात बसत नसल्याची नोटीस शेतकर्यांना देत फळबाग अनुदान आवेदन रद्द करून शेतकर्यांना फसवण्याचे काम कृषी विभाग करत आहे. कृषी फळबाग अनुदान शेतकर्यांच्या हक्काचे आहे. जर मंजूर केले नाही तर कृषी विभाग कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन केले जाईल.

कृषी अधिकारी पाथर्डी प्रविण भोर म्हणाले, मनरेगा कृषी फळबाग योजनेअंतर्गत भालगावातील 17 शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवेदन भरण्यापूर्वी निकषात बसत नसल्याची कल्पना दिली होती. पाथर्डी तालुक्यात 600 हेक्टरवर फळबागा लागवड केली आहे. भालगावातील 17 शेतकर्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत कृषी विभाकडून सहकार्य केले जाईल.