राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri Vidyapith

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे चोरीचोरी चुपके चुपके सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीने गावातील रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत.

या अवैध वाळू वाहतुकीला आळा घातला नाही तर डिग्रस गावातील शिष्टमंडळ ना. प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे डिग्रसच्या गावपुढार्यांनी सांगितले.

पत्रकात म्हटले, गावामध्ये दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे गावातील व परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे या गावातील शेतकर्यांच्या उसाची तोड करण्यासाठी ऊस तोड कामगार येण्यास धजावत नाही.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डिग्रस हद्दीतील नदीपात्रातून ही वाळू वाहतूक सर्रास सुरू झाली असून केटीवेअरच्या पायथ्याजवळील वाळू काढण्याचा प्रकार दैनंदिन सुरू असल्याने केटीवेअरला धोका निर्माण झाला आहे. हा केटीवेअर पूल अखेरच्या घटका मोजत आहे.

याबाबत राहुरीचे तहसीलदार शेख यांच्याकडे गावकर्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली नाही व वाळू वाहतूक करणार्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. वाळू वाहतुकीवर कारवाई नाही झाल्यास ना. तनपुरे यांची भेट घेणार असल्याचे डिग्रसचे माजी सरपंच व बाभळेश्वर दूध संघाचे विद्यमान संचालक रावसाहेब पवार, केशव बेल्हेकर, डिग्रस सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष बेल्हेकर यांनी म्हटले आहे.