संत शेख महंमद महाराज मंदिर बारवेवर दीपोत्सव

महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा उपक्रम
संत शेख महंमद महाराज मंदिर बारवेवर दीपोत्सव

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)

श्रीगोंदा नगरीचा इतिहास मोठा गौरवशाली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. पंढरीच्या पांडुरंगाशी थेट नाते सांगणारी ही पवित्र भूमी. भारतातील पवित्र सरस्वती नदीचा सहवास इथे श्रीगोंदेकरांना लाभला आहे. प्राचिन राजमार्गाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात उभ्या आहेत.

बारव या त्यापैकीच पाऊलखुणा आहेत. पुर्वीच्या काळी श्रीगोंद्यामध्ये जलव्यवस्थापन अप्रतिम होते. श्रीगोंदे तालुक्यात 100 पेक्षा अधिक बारवा, दगडी पायविहिरी अस्तित्वात होत्या. त्यातील एक अप्रतीम तीन मजली बारव म्हणजे श्री संत शेख महंमद महाराज मंदिर याठिकाणी दिवाळीनिमित्त महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्यावतीने दिपोत्सव उपक्रम राबवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी श्री संत शेख महंमद महाराज यांच्या नित्य वापरासाठी ही बारव 1596 साली बांधून घेतली आहे. 406 वर्षापूर्वीची बारव श्रीगोंदे तालुक्यातील या सर्व बारवा आपल्या पूर्वजांचे वैभव, परंपरा संस्कृती आणि वारसा सांगत आहेत. इथे इतिहास घडला आहे. शेकडो वर्षांपासून अनेकांची तहान या बारवांनी शमविली आहे. जीवंत पाण्याचा स्रोत असलेल्या या बारवा आहेत. या बारवांचे जतन करण्यासाठी स्वच्छता करून पूर्वीप्रमाणे संवर्धन करण्याचा प्रयत्न रोहन काळे यांच्या साथीने महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवार करत आहे.

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम एकोपा जपणारी महान विभुती श्री संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरातील तीन मजली बारव दिवाळी पाडव्याला 1406 दिव्यांनी उजळून निघाली. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला युगायुगांचा अलौकिक वारसा मातीच्या दिव्यांनी उजळून निघाला. श्रीगोंदा तालुका पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, यांचे हस्ते दीपप्रज्वलन व बारव पाण्याचे जलपूजन करण्यात आले. शेख महंमद महाराजांचे वंशज पत्रकार अमीन शेख, राजू शेख, यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळराव मोटे पाटिल, शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, उपाध्यक्ष, डॉ. चन्द्रशेखर कळमकर, सचिव सोमेश शिंदे, संपर्कप्रमुख, महिला रणरागिणी, बालमावळे यांच्यासह शिवदूर्ग परिवाराचे 50 स्वयंसेवक मावळे उपस्थित होते. शेकडो श्रीगोंदेकरांनी उपस्थित राहून हा नयनरम्य सोहळा अनुभवला.

नजरेआड गेलेला वारसा

पुन्हा नव्याने उजेडात यावा म्हणून शिवदुर्ग परिवार बारव दिपोत्सव साजरा करत आहे. श्रीगोंद्यातील सर्व बारवा टप्प्याटप्प्याने शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंंडेशन परिवार तरुणाईला सोबत घेऊन लोकसहभागातून संवर्धित करणार आहे.आपला ऐतिहासिक वारसा आपण जतन करूया, असे उदगार शिवदुर्ग संचालक संकेत नलगे यांनी काढले. तर याठिकाणी दीपोत्सवाची रांगोळी प्रतिभा इथापे, कपिल उल्हारे यांनी काढली. मारूती वागसकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार संचालिका संगीता इंगळे यांनी मानले. यावेळी स्वयंसेवक म्हणून शिवदुर्गच्या पुरुष व महिला रणरागिनी यांनी आपले योगदान दिले. गणेश कविटकर, सुहास कुलकर्णी, नितीन शेळके, संकेत लगड, रोहिणी शेळके, अक्षीका इंगळे, नितीन घालमे, नीरज पाडळे, अजित लांडगे, मिठू लंके, अमोल बडे, गोरख कडूस, हेमंत काकडे, मारूती साळवे, सुषमा साळवे, भूषण काकडे, मनेश जठार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com