कितीही प्रतिज्ञापत्रे घ्या, शिवसैनिक शिवसैनिकच असतो - दिपक केसरकर

कितीही प्रतिज्ञापत्रे घ्या, शिवसैनिक शिवसैनिकच असतो - दिपक केसरकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आज कुठल्याही गांवात गेला तर प्रत्येक शिवसैनिकाचा हाच विचार आहे की आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नव्हे. त्यामुळे त्यांच्याकडून कितीही प्रतिज्ञापत्र करुन घेतले तरीदेखील शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आ.दिपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या भाजप शिंदे सरकारमधील शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दिपक केसरकर यांनी बुधवारी दुपारी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहानास प्रतिसाद देत येत्या 15 आँगस्ट रोजी देशाचा तिरंगा ध्वज प्रत्येक घरावर फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करावा. सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणाबाबत बोलतांना त्यांनी सांगितल, अंतिम विजय सत्याचा होईल याची मला खात्री आहे.

आजच आमचा अर्ज निवडणूक आयोगासमोर गेला असून आमचा दावा खरा आहे. ज्यावेळी हिंदुत्वाचा आणी हिंंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचार धारेचा विषय येईल, तेव्हा शिवसैनिक पेटून उठेल. आणी एकसंघ शिवसेना पुन्हा एकदा जगाला दिसेल. ज्यावेळी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तेव्हा मला एकट्याला शिर्डीस जाण्यासाठी परवानगी दिली होती. तेव्हाची शिर्डीची शाल उध्दव ठाकरे यांना घालतांना त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे ते साईबाबांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले. परंतु अशीच साईबाबांची कृपा पुन्हा त्यांच्यावर होण्याच्या दृष्टीने काही संकेत झाले होते.

दुर्दैवाने त्या संकेतांचे पालन झाले नाही. आणी म्हणून पुढची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने बघीतली आहे. आम्ही भक्त असतो म्हणजे अंध भक्त नाही. देव भक्तीचा भुकेला असतो.त्यामुळे हे दैवी संकेत आहे. या दैवी संकेतातून एक चांगले शासन हे महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांना बळ मिळावे. त्यांची एकी अशीच टिकू दे, तसेच महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना शक्ती मिळू दे अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पूरपरिस्थितीकडे वाईट म्हणून बघतो परंतु शेतकर्‍यांसाठी पाऊस नाही तर काय नाही. जल ही जिवन है असे म्हणत ज्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे त्यांना आमचे सरकार मदत करेल अशी ग्वाही दिली. सर्वसामान्य लोकांना स्थिर सरकार हवे आहे त्यामुळे साईबाबांच्या कृपाआशिर्वादाने स्थिर सरकार महाराष्ट्रात आले असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com