भोकर येथील दीपक बर्डे अपहरण प्रकरणातील पाचव्या संशयितास अटक

भोकर येथील दीपक बर्डे अपहरण प्रकरणातील पाचव्या संशयितास अटक

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे याच्या अपहरण प्रकरणात आणखी एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यालयाने दि. 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तरुणाचे अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटूनही तपास लागलेला नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकल्याचे दिसत आहे.

भोकर येथील रहिवाशी व एकलव्य युवा संघटेनेचा तालुकाध्यक्ष दीपक बर्डे याचा दि. 31 ऑगस्टपासून संपर्क न झाल्यामुळे त्याचे वडील रावसाहेब बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस ठाण्यात इमरान अब्बास शेख (रा. पुणे), मजनू बबन शेख, समीर अहमद शेख, अजीज बबन शेख व राजू बबन शेख (सर्व रा. भोकर, ता. श्रीरामपूर) यांचे विरूद्ध भादंवि कलम 342, 364, अनुसूचीत जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989, 3 (2), अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 3 (व्ही) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील इमरान शेख, मजनू शेख, समीर शेख व अजीज शेख यांना संशयित म्हणून यापुर्वीच अटक करण्यात आली परंतु यातील पाचवा राजू बबन शेख हा पसार होता. पोलिसांनी दि. 3 सप्टेंबर रोजी राजू शेख यास अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणातील अपहृत तरूण दीपक बर्डे याचा पोलीस पथक शोध घेत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संशयिताच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान, दीपकचा घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय असल्याने त्या दिशेनेही पोलीस पथक शोध घेत आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com