दीपक बर्डेचा जायकवाडी धरणात घेतला जातोय शोध

8 पोलीस अधिकार्‍यांसह 77 कर्मचारी व 17 जलतरणपटूंकडून प्रवरासंगमपासून दहेगावपर्यंत शोध मोहीम || 6 बोटींचा वापर
दीपक बर्डेचा जायकवाडी धरणात घेतला जातोय शोध

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या दीपक बर्डे या तरुणाची हत्या केल्याची कबुली अटक असलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली असल्याने 8 पोलीस अधिकार्‍यांसह 77 पोलीस कर्मचारी यांच्यासह पट्टीच्या पोहणार्‍या 17 खासगी तरुणांसह प्रवरासंगम-कायगाव येथील गोदावरी पात्रात जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये 2 यांत्रिक (स्पीड बोट) व अन्य 4 अशा 6 बोटींद्वारे शोध घेत आहेत.

भोकर येथील दीपक बर्डे हा तरुण गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या बेपत्ता असल्यामागे घातपात असल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केल्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपींनी तरुणाचा मृतदेह कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथील बंधार्‍यावरून पाण्यात टाकला असल्याचे समजते.त्यामुळे कमालपूरपासून गोदावरी नदीत शोध घेतल्यानंतर थेट प्रवरासंगम-कायगावपर्यंत पोलीस शोध घेत आहेत. प्रवरासंगम येथे जायकवाडीचे बॅकवॉटर असल्याने या मोठ्या पाणीसाठ्यात 6 बोटींद्वारे काल दिवसभर शोध घेण्यात आला.

अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,अप्पर पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांचेसह तीन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक एक सहायक पोलीस निरीक्षक अशा 8 पोलीस अधिकार्‍यांसह 77 पोलीस कर्मचारी जायकवाडी जलाशयाचा फुगवटा असलेल्या प्रवरासंगम येथे गोदावरी नदीपात्रात अपहृत तरुणाचा शोध घेत आहेत.

पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ टीम, 4 रेग्युलर बोट व 2 स्पीड बोटीच्या साहाय्याने तसेच पट्टीचे पोहणारे खाजगी 17 तरुणांची मदत घेऊन दि11 सप्टेंबर 12 सप्टेंबर रोजी सकाळ पासून रात्री पर्यत हे अभियान राबविण्यात आले. रामेश्वर मंदिर ते शेवगाव तालुक्यातील दहेगाव पर्यत जायकवाडी धरण पात्रात ही मृतदेह शोधमोहीम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले. काल सोमवारी कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, अंबादास गीते गणेश इथापे, सुमित करंजकर, रामचंद्र वैद्य, हे गेल्या 7 सप्टेंबर पासून नेवासा तालुक्यात शोधमोहीम राबवत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com