डी. एड. पदविका प्रवेशाला उतरती कळा
सार्वमत

डी. एड. पदविका प्रवेशाला उतरती कळा

याही वर्षी प्रवेश घटणार, नव्या धोरणाचा होणार परिणाम

Arvind Arkhade

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये प्राथमिक स्तरावर बी. एड. पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. येणार्‍या कालखंडात डी.एड. पदविका कालबाह्य होण्याचा धोका असल्यामुळे याही वर्षी डी. एडच्या प्रवेशाला गळती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून डी.एड. पदवीकेला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. राज्यात एकूण मंजूर असलेल्या प्रवेश क्षमतेपैकी अवघे 35 टक्के प्रवेश शिक्षणशास्त्र पदविकेला होत असल्याचे चित्र समोर आले आहे.त्यात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिकपासून तर उच्च माध्यमिक पर्यंत बी.एड. पदवी ग्राह्य धरली जाणार आहे, असे सूतोवाच करण्यात आले आहे.

त्यामुळे प्राथमिकसाठी डी.एड. पदविका येणार्‍या काळात कालबाह्य होण्याचा धोका आहे. राज्यात 14 डी.एड शासकीय विद्यालये आहेत. त्यात 797 इतकी क्षमता असून मागील वर्षी केवळ 536 प्रवेश झाले आहेत. अनुदानित 97 अध्यापक विद्यालये असून 4545 प्रवेश क्षमता असून त्यापैकी केवळ 3180 प्रवेश झाले आहेत.

720 विनाअनुदानित अध्यापक विद्यालये असून 46 हजार 620 प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी अवघे 14265 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अशा एकूण 831 अध्यापक विद्यालयातील 51 हजार 962 प्रवेश क्षमतेच्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 17 हजार 981 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. राज्यात कधीकाळी एक लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती. त्या प्रवेशांना गळती लागून आता प्रवेश क्षमतेच्या 30 ते 35 टक्के विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणार्‍या काळात ही पदविका कालबाह्य होण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत.

संस्थाचालक डी.एड बंद करण्याच्या तयारीत

राज्यात सध्या 731 अध्यापक विद्यालये आहेत. शासनाने यापूर्वीच स्वतःची अध्यापक विद्यालये बंद केली आहेत. तर विद्यार्थी मिळत नाही म्हणून अनेक संस्थाचालकांनी यापूर्वीच कुलूप लावले आहे. यावर्षी विद्यार्थी न मिळाल्यास पुन्हा संस्थाचालक विद्यालये बंद करण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता सातत्याने घटत आहे. त्यात शासनाच्या धोरणातही बदल होत असल्यामुळे डी.एडचे प्रवेश आटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डी.एडला विद्यार्थी मिळेना

राज्यात गेली काही वर्षे डीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा आटतच चालला आहे. कधी एकेकाळी राज्यात अत्यंत गुणवत्तेचे विद्यार्थी या पदविकेला प्रवेश घेत होते. गेल्या काही वर्षांत मात्र या पदवीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे केवळ 40 ते 45 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. अनेक ठिकाणी पाच दहा वर्षांपूर्वी सुटलेले विद्यार्थी, काही नापास होऊन पुन्हा पास झालेले विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. हे विद्यार्थी पदवी घेत असले, तरी भविष्यातील शिक्षक प्रवेश प्रक्रियेसाठी काठिण्य पातळी अधिक असल्याने शिक्षक होण्याचे भविष्य कठीण मानले जात आहे.

धोरणानंतर बंद होणार अध्यापक विद्यालये

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने वर्मा आयोगाच्या संदर्भात उल्लेख करत, यापुढे शिक्षणशास्त्र महाविद्यालय दर्जेदार स्वरूपात अस्तित्वात नसतील, तर त्यांना टाळा लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशभरातील शिक्षण शास्त्र विद्यालये, महाविद्यालये ही सक्षम नसल्याचा ठपका वर्मा आयोगाने ठेवला आहे. केवळ पदव्या देणारी विद्यालये असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे नव्या धोरणाप्रमाणे शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालये, महाविद्यालयांवरती शासनाची करडी नजर असणार आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापन या संस्थांचे होणार असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थी मिळाले तरी शासनाच्या नियमांचे व सुविधांचे पालन करणे अनेकांना जड जाणार आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीत आणखी अध्यापक विद्यालये, महाविद्यालये बंद होण्याचा धोका आहे.

पदवी मिळून नोकरी नाही

सध्या शिक्षक होण्यासाठी केवळ डी. एड, बी.एड. असून उपयोग नाही, तर त्यानंतरही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे करण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मुलाखत, पाठाचे सादरीकरण, यासोबत शिक्षकांची गुणवत्ता महत्त्वाची मानली जाणार आहे. नवीन धोरणाप्रमाणे चार वर्षांची बी. एड पदवी सुरू होणार आहे.त्यात राज्यात सुमारे 84 हजार विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असले तरी त्यांना नोकरी नाही. गेल्या दहा वर्षांत केवळ राज्य शासनाच्या सेवेत सहा हजार प्राथमिक शिक्षक दाखल झाले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात शिक्षक होण्याच्या संधी कमी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आटत जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com