... अन्यथा आमरण उपोषण; आमदार राजळे यांचा इशारा
आमदार मोनिका राजळे

... अन्यथा आमरण उपोषण; आमदार राजळे यांचा इशारा

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे व दीड महिन्यापासून दररोज सतत होणाऱ्या पावसामुळे हजारो एकरावरील शंभर टक्के शेतीपिके वाया गेली आहेत. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह भाजपाचे सर्व आजी, माजी आमदार, खासदार व पदाधिकारी कोणतीही सूचना न देता आमरण उपोषण करतील, असा इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे.

आ. राजळे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेड्डीवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतात पुराचे पाणी शिरून शेती खरडून गेली, वाड्या-वस्त्यांवरील घरात व शहरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ते यांचे नुकसान झाले. शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले त्याला दीड महिना उलटून गेला मात्र सरकारने अजून एक रुपयाची मदत नुकसानग्रस्तांना दिली नाही. अजुनही पाऊस सुरूच असून सर्वच महसूल मंडळातील शेतीपिके पाण्यात असून शेती पिके व फळबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. शासनाने संवेदना दाखवून अतिवृष्टी झालेल्या भागात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे सरसकट मदत नुकसानग्रस्तांना द्यावी. तसेच घरांचे, जनावरांचे व संसारोपयोगी साहित्याचे व व्यावसायिकांच्या दुकानांचे नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत करावी, अन्यथा लोकभावनांचा उद्रेक होऊन शासनाच्या विरोधात नुकसानग्रस्तांसह लोकप्रतिनिधींना उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आसाही इशारा आ. राजळे यांनी दिला आहे.

पाथर्डी तालुक्यात ९३५.१ मी.मी पाऊस होऊन सरासरी ९८९.५% पाऊस झाला आहे. शेवगाव तालुक्यात आत्तापर्यंत ८२६.१ मी.मी. पाऊस होऊन सरासरी १७९.५% पाऊस झालेला आहे. तसेच ५ ते ६ वेळा ढग फुटी सारखी अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत असून हजारो हेक्टर शेती पिके, फळबागा पाण्यात आहेत.

मंत्र्यांचे दौरे कशासाठी?

अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या पण अजूनही मदत मिळत नाही मग हे दौरे केले कशासाठी ? जिल्ह्यात पालकमंत्र्यांसह चार मंत्री आहेत त्यांना जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या संवेदना जाणवत नाहीत काय? असा सवाल आ. राजळे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.