अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शासनाकडून शहर/जिल्हा लॉकडाऊन केले जाणार नाही. जनता कर्फ्युचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा. जो निर्णय होईल त्याच्याशी मी सहमत असेल असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी टाळेबंदी फेटाळत जनता कर्फ्युचे समर्थन केले. मात्र स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगत आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी वेळ मारून नेली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी बाधित बरे होण्याचे प्रमाण हे 85 टक्के इतके आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नगर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. आढावा बैठकीत जनता कर्फ्युवर चर्चा झाली. शासनाकडून शहर किंवा जिल्हा लॉकडाऊन केला जाणार नाही. जनता कर्फ्युचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जावा असे सांगितले आहे. स्थानिक पातळीवर जो निर्णय होईल त्या निर्णयाशी मी सहमत असेल. प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगत पालकमंत्री मुश्रीफ यांनी टाळेबंदी फेटाळत त्याचे चेंडू आमदार, महापौरांकडे टोलावला. तेथेच उपस्थित असलेले आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यापारी, व्यावसायिकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगत वेळ मारून नेली.

मंत्री मुश्रीफ यांनी विखेंना चिमटा काढला

गरजवंताला ऑक्सिजन बेड मिळत नाही, हे खरे असले तरी ऑक्सिजनची जिल्ह्यात कमतरता नाही. औषधाचा साठाही मुबलक आहे. मी ज्युनिअर असून राधाकृष्ण विखे पाटील हे सिनीअर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी विखेंना चिमटा काढला.

20 मे. टनाचा ओटू प्लांट

नगर जिल्ह्याला ऑक्सिजनची टंचाई भासू नये यासाठी 20मे. टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यात येणार असल्याची मािंहती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामाचे कौतूक करत आजपर्यंत 14 वेळा जिल्ह्यात आलो. रोज जिल्ह्याची परिस्थितीची माहिती घेतो असे सांगत पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरबद्दलची अस्था स्पष्ट केली.

मराठा आरक्षण, अध्यादेश किंवा रिट

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारसमोर अध्यादेश काढणे किंवा कोर्टात रिट पिटीशन दाखल करणे हे दोन पर्याय आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. कोर्टाच्या स्थगितीमुळे आरोग्य भरतीला अडचणी येत आहेत. स्थानिक पातळीवर कंत्राटी पध्दतीने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. आरक्षण मिळाल्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.