जम्बो ऐवजी कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करा

जम्बो ऐवजी कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करा

नगराध्यक्षांसह भाजपाच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत उभारण्यात येणार्‍या 4200 खाटांचे जम्बो कोविड सेंटरऐवजी या सेंटरचे विकेंद्रीकरण करून सध्या या तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये थोड्याफार प्रमाणात खाटांची संख्या वाढवावी. तसेच साईबाबा संस्थांनने या ठिकाणी मदत करावी, अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या शिर्डीत 4200 रुग्णांसाठी जम्बो रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात शासन स्तरावरून तत्त्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे समजते. सदर सेंटर सुरू करण्याबाबत आमचे वेगळे मत आहे. जम्बो कोविड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री, डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ कसा व कोठून उपलब्ध होईल, याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या शहरात सुद्धा वैद्यकीय कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थानकडे वैद्यकीय कर्मचार्‍यांची कमतरता आहे आणि जे आहेत ते गेल्या वर्षभरापासून जीवावर उदार होऊन प्रचंड तणावात सेवा देत आहे. अशात त्यांच्यावर अति ताण-तणाव आल्यास सर्व व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जम्बो रुग्णालय आजूबाजूच्या दहा तालुक्यांसाठी विचारात घेऊन केले जात आहे. परंतु रुग्णालयाचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. त्यापैकी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर येथे पाचशे खाटांच्या रुग्णाची व्यवस्था सध्या चालू आहे. त्यातच थोड्याफार प्रमाणात वाढ करण्यात यावी. गरज पडल्यास साईबाबा संस्थांनने मदत करावी. जेणेकरून कोणत्याही एका ठिकाणी कामाचा व्याप वाढणार नाही.

शिर्डी संस्थानमार्फत दोन क्विट सेंटर सुरू असल्याने येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये नॉन क्विड रुग्णांत संदर्भातील आरोग्य सेवा बाधीत झाली आहे. आता नव्याने तिसर्‍या ठिकाणी कुबेर सेंटर सुरू करण्याची चर्चा आहे. सध्या शिर्डीतील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिर्डी जवळपास 45 हजार लोकसंख्येचे शहर असून लवकरात लवकर येथे लसीकरण केंद्र चालू करणे गरजेचे आहे. शिर्डीत इतके मोठे सेंटर सुरू झाल्यावर शिर्डी करोना रुग्णांचा हॉटस्पॉट होईल. या भीतीने ग्रामस्थांमध्ये आणि संस्थान कर्मचार्‍यांमध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण आहे. तरी आमच्या सूचनांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, सुधीर शिंदे, नरेश सुराणा, किरण बोराडे, मंगेश त्रिभुवन, स्वानंद रासने, सोमराज कावळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com