
नेवासाबुद्रुक |वार्ताहर| Newasa Budruk
नेवासा येथील पाठीवर जन्मजात शिवप्रतिमा असलेल्या ‘राजे’ नावाच्या अश्वाचे (घोड्याचे) आजारी असल्याने 4 डिसेंबर रोजी निधन झाले. सर्वात सुंदर, रुबाबदार व नशीबवान असा नावलौकिक मिळवलेल्या या अश्वाचे (घोडा) निधन झाल्याने अश्वप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.
नेवासा येथील शेतकरी नानासाहेब शेंडे यांचा हा अश्व होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक अश्व मादी आणली होती. तिच्या वेतातून हा नर अश्व जन्माला आला. त्यांनी त्याचे पालन पोषण केले. लहानपणी या अश्वाच्या पाठीवर व मांडीवर शिवप्रतिमा असल्याचे जाणू लागले. अश्व मोठा होत गेला तशी शिव प्रतिमा उठावदार आणि स्पष्ट दिसू लागली. मालक देखील आश्चर्यचकित झाले आणि नंतर त्याला घोडा न म्हणता राजे या नावाने संबोधू लागले. सदरील अश्व बघण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून शिवप्रेमी नेवासा येथे येत असत.
ढगाळ वातावरणात अश्वाला पॅरालेसिस झाल्याचे सांगून अश्वाचे मालक नानासाहेब शेंडे म्हणाले, जगातील सर्वात मोठी संपत्ती असणारा माणूस असे मी स्वतःला समजत होतो. सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान असलेला राजें मुळं संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याची खंत वाटते.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यभूमी मध्ये शेंडे यांच्या घरी असलेल्या अश्वामुळे नेवासा तालुक्यातील सर्व शिवप्रेमीचीं मान उंचावली होती आज ‘राजे’च्या जाण्याने नेवासे गावासाठी काळा दिवस अल्याचे सर्पमित्र पुरुषोत्तम चिंधे म्हणाले.