करोना रुग्णाचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड

नगरमधील ‘या’ रूग्णालयात घडली घटना
करोना रुग्णाचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmedagar

ऑक्सिजन व रेमडेसिवीर न मिळाल्याने करोना रुग्णांचे हाल होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे.

यामुळे नातेवाईकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात एक करोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचांची तोडफोड केली. अचानक झालेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान घटनास्थळी तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

नगरमध्ये जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पालकमंत्र्यांनीही ऑक्सिजनच्या तुटवड्या संदर्भात साशंकता उपस्थित केली आहे.

नगर तालुक्यातील एका करोना संसर्ग रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. रुग्णाच्या नातेवाईकांनी यावरून चांगलाच गोंधळ घातला. यातील एकाने अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या.

या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी तोडफोडीचा पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे तोफखाना पोलिसांनी सांगितले. सायंकाळी उशीरपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com