देवळाली प्रवराच्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत
देवळाली प्रवराच्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

राहुरी फॅक्टरी येथील अक्षय ट्रेडर्सचे मालक रवींद्र ढूस यांचा मुलगा अक्षय रवींद्र ढूस (वय 22, रा. देवळाली प्रवरा) हा तरुण आईसोबत आपल्या नातेवाईकांकडे गेला असता घरासमोर असणार्‍या तुडूंब भरलेल्या विहिरीत त्याचा पाय घसरून मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (दि.2) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

दुपारची वेळ असल्याने करपे यांच्या विहिरीत चार,पाच मुले पोहत होती. तेथेच त्याचा तोल जाऊन पाय घसरून मृत्यू झाला. तो खाली गेल्यानंतर वर न आल्याने मित्र घाबरून गेले. त्यांनी ही घटना घरच्यांना सांगताच एकच आक्रोश सुरू झाला.

घटनेची माहिती समजताच उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक शैलेंद्र कदम, सचिन ढूस, गणेश भांड, भारत शेटे, अशोक खुरुद, दत्तात्रय ढूस, राजेंद्र लोंढे, भगवानराव कदम, पोलीस पाटील नामदेव जगधने, माजी सरपंच ज्ञानदेव निमसे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. संदीप मुसमाडे यांच्यासह साई प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, प्रविण देशमुख, संदीप कदम, अमोल कदम, पियुष शिंदे, संदीप खुरुद, संदीप भांड आदींसह देवळाली प्रवरा परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने नगरपरिषदेच्या पथकाला पाचारण करून चार विद्युत मोटारी पाणी उपसण्यासाठी विहिरीत टाकून पाणी उपसण्याचे काम सुरू केले.

देवळाली प्रवरा येथील पट्टीचे पोहणारे ताराचंद गोलवड, तुकाराम चव्हाण, विजू पवार, विशाल बर्डे, गिरीश कदम यांना पाचारण करण्यात आले. विहिरीत जास्त गाळ असल्याने त्यांच्या कामात व्यत्यय येत होता.

पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र ढूस यांना अक्षय व डॉ. कोमल असे दोन अपत्य होते. रात्री उशिरा अक्षयच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अक्षयची बहीण डॉ. कोमल ही नगरहून आली. तिने, दादा मी आणलेली राखी आता उद्या कोणाला बांधू? असे म्हणून आक्रोश सुरू केला. ढूस परिवाराचा आक्रोश बघून उपस्थितांची मने हेलावून गेली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com