अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
अपघातामध्ये लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली सहा महिन्याची साधी कैद व एक हजार रूपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांनी कायम केली आहे. बाबाजी श्रीपत गुंड (रा. सारोळाबद्दी ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
27 ऑक्टोबर, 2017 रोजी दुपारी या घटनेतील फिर्यादी यांचा भाऊ विठ्ठल हा त्याचा मुलगा सार्थक हा आजारी असल्याने त्याच्या पत्नीसह मुलगा सार्थक याला दुचाकीवरून दवाखान्यात घेवुन जात होते. दुपारी 03:35 वाजेच्या सुमारास नगर-जामखेड रोडवर हत्ती बारवजवळ विठ्ठलच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये फिर्यादीचा भाऊ विठ्ठल, भावजयी ज्योती व मुलगा सार्थक जखमी झाले होते. 28 आक्टोबर, 2017 रोजी सार्थक याचा उपचारदरम्यान मृत्यु झाला. सदर घटनेबाबत फिर्यादीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात खटला नोंदविण्यात आला. आरोपींविरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात आरोपी गुंड याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचे अपील अंशतः मंजुर केले व कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. सदर अपीलामध्ये सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले.