टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते गणेशनगर हा 15 किमी अंतरावर असलेला रस्ता अतिशय खराब व खड्डेमय झाला असून

रस्ता कमी आणि खड्डे जास्त झालेल्या असल्याने नियमित या रस्त्यावर अपघात घडत असतात यात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकजण जायबंदी झाले आहेत.

हाच रस्ता शिर्डी-शिंगणापूर बायपास म्हणून देखील ओळखला जातो. गेल्या दोन वर्षांपासून दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी खड्ड्यात झाडे लावून खड्ड्यांत बसून मुंडन आंदोलन, खड्ड्यांत झोपून आंदोलन तर कधी भिक मांगो आंदोलन करुनही जाग येत नसल्याने विविध प्रकारचे आंदोलन करून 15ऑगस्ट 2020 ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून लक्ष वेधून घेण्यासाठी पाठपुरावा केला. साईबाबा संस्थानचे अधिकारी कान्हुराज बगाटे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.

खा. सदाशिव लोखंडे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना जेवढे लवकर होईल तेवढ्या तत्परतेने रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सूचना करून देखील काहीच उपयोग झाला नाही .एमआयडीसी प्राधिकरणाची अनेक जड वाहतूक होत असताना देखील अधिकारी हात झटकण्याचे काम करत आहेत.

अनेक राजकीय पक्ष, प्रशासनाचे अधिकारी यांचे उंबरठे झिजवूनही हा रस्ता आमच्या कडे वर्ग झाल्यानंतर बघू असे बोलून टोलवाटोलवी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना देखील पत्रव्यवहार करूनही आजमितीला जैसे थी परीस्थिती असल्याने दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे व दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून व हुतात्मा दिना निमित्त दत्तनगर वाकडी फाटा याठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समीतीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी आंदोलन स्थळी येऊन जिल्हा परिषद व एमआयडीसी प्राधिकरण एकत्रितपणे तालुक्यातील यशवंत बाबा चौकी पर्यंत डांबर युक्त खड्डे बुजवून पुढील 8दिवसांत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासन दिल्यानंतर व स्वत:हमी घेतल्याने आत्मक्लेश आंदोलन दुपारनंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सचिन बनसोडे, जय भोले गृप, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाठ, भीमशक्तीचे अध्यक्ष संदीप मगर, शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, कामगार नेते नागेश सावंत, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सुनील जगताप, उमेश शेजवल, नितीन धिवर, राजवाडा प्रतिष्ठानचे संजय शिरसाठ, बाबा प्रतिष्ठानचे स्वप्नील सोनार, डॅनियल भोसले, शहा राजमहंमद, मेहबूब कल्याण, केतन लांडे, सुखदेव ढोकचौळे, सुरेश शिवलकर आदी उपस्थित होते.