दत्तनगरला ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल वॉर’

जोरदार हायटेक प्रचारतंत्राचा वापर || गाव पारावर उचलला पैजेचा विडा
दत्तनगरला ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल वॉर’

टिळकनगर |वार्ताहर|Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत सरपंचपदाची तिरंगी लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहे. तर विखे गट व ससाणे गटांनी आपापल्यापरीने लोकनियुक्त सरपंचपदाचा दावेदार आखाड्यात उतरविला असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचे मोठे आव्हान असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगभरणी होणार असल्याचे संकेत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला अवघे 8 दिवस उरल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा आधार घेऊन तिन्ही गटांचा हायटेक प्रचारतंत्राचा वापर सुरू झाला आहे. बॅनर, पत्रके आणि मतदारांच्या समक्ष गाठीभेटींवर भर दिला जात असून आरोप- प्रत्यारोपांना चांगल्याच उकळ्या फुटू लागल्या आहे. पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरील प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. वेगवेगळे फोटो, लहान आकाराचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकाराचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ‘सोशल वॉर’ सुरू झाल्याचे चित्र आहे. गावातील स्थानिक आघाडी व उमेदवारांची माहिती पत्रके, जाहीरनामे, पदयात्रा असा पारंपरिक प्रचार सुरूच आहे. याचबरोबर प्रचारात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

तिन्ही गट आपलेच उमेदवार योग्य असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर करीत आहेत. या निवडणुकीत सरपंचपदासाठी तिन्ही मंडळाने आपली राजकीय प्रतिष्ठापणाला लावल्याने निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरणार आहे. थेट सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर चर्चेच्या फैरी परिसरात झडू लागल्या आहेत.

अखेर ‘ते’ फोटो झाकले !

दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाकडून स्व. जयंतराव ससाणे यांच्या फोटोचा वापर प्रचाराच्या सुरुवातीलाच दिसल्याने ससाणे गटांकडून तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे दोन दिवसांपासून ससाणे गटाकडून विखे गटावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार सोशल वॉर चालू असल्याने काल विखे गटाने फ्लेक्सवर छापलेले स्व. जयंतराव ससाणे यांचे फोटो झाकून टाकले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com