दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व उमेदवारी अर्ज वैध

आज माघार, गावपुढार्‍यांची दमछाक होणार
दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व उमेदवारी अर्ज वैध

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 91 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, छाननी प्रक्रियेत सरपंच पदासह सर्व सदस्यपदाचे सर्व अर्ज वैध झाले.

या निवडणुकीसाठी माघार आज दुपारी 3 पर्यंत रावबली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केल्यावर चिन्ह वाटप केले जाईल. त्यानंतर संपूर्ण निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दत्तनगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. सरपंच पुन्हा जनतेतून निवडला जाणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. ही भाऊगर्दी कमी करता करता नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गावातील गावपुढार्‍यांनी आपल्याच गटाचे वर्चस्व राहावे, आपल्याला अमुक उमेदवाराकडून नुकसान होणार नाही, यासाठी उमेदवारांना माघारीसाठी विविध आश्वासने दिली जात आहेत.

शब्द दिले जात आहे. तसेच गावपुढार्‍यांनी रात्री बेरात्री गुप्त बैठका घेतल्याचे समजते. या गुप्त बैठकांत गावपुढार्‍यांना कितपत यश मिळते हे माघारीनंतर दिसेल. एकूण 17 सदस्य संख्या आहे. तर काहींचे बंडाचे निशाण आणखीच जोमात फडकणार असून आपली स्वतंत्र चूल मांडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जर असे घडले तर येथील एका गटाला जोरदार हादरा बसण्याचे चिन्हे दिसत आहे. नेमके आज काय चित्र पहावयास मिळते यासाठी मतदार राजा बारकाईने लक्ष ठेवून आहे.

राजकारण व निवडणुकांमुळे गावात गट तट निर्माण होऊन गावच्या विकासाला खीळ बसते. त्यामुळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व तरुणांनी एकविचाराने गावाच्या विकासासाठी गावपुढार्‍यांनी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घ्यावा, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे, परंतु गावातील वातावरण पाहता हे तूर्तास शक्य नसल्याचे निदर्शनास येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com