दातीर हत्याकांडात राहुरीचा आडतेव्यापारी गावडे सहआरोपी

घटनेनंतर सहआरोपी पसार; आरोपींना आर्थिक मदत केली
दातीर हत्याकांडात राहुरीचा आडतेव्यापारी गावडे सहआरोपी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडात अखेर राहुरी येथील अनिल गावडे या कांदा व्यापार्‍याला सहआरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू मोरेसह लाल्या ऊर्फ अर्जुन माळी, तौफिक शेख, अक्षय कुलथे यांना अटक केली आहे. मात्र, हत्याकांडानंतर अद्यापपर्यंत सह आरोपी अनिल गावडे हा पसार आहे. पोलीस पथकाकडून त्याचा शोध सुरूच आहे.

दरम्यान, पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडात शहरातील कांदा व्यापारी अनिल गावडे हा असल्याची चर्चा सुरू होती. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू होता. अनिल गावडे याने मुख्य आरोपी कान्हू मोरे याला आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला पत्रकार दातीर यांच्या हत्याकांडात सहआरोपी करण्यात आले. घटनेनंतर अद्यापपर्यंत सहआरोपी गावडे हा पसार आहे.

राहुरी येथील पत्रकार दातीर हे दि. 6 एप्रिल रोजी मल्हारवाडी रोडने आपल्या घरी जात होते. यावेळी अचानक पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण केले. त्याच दिवशी रात्री दातीर यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात मिळून आला होता. दातीर यांना जबरदस्त मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेतील सर्वच आरोपी पसार झाले होते. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली होती.

दि. 8 एप्रिल रोजी सांयकाळी या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जुन विक्रम माळी (वय 25, रा. जुने बसस्थानक, एकलव्य वसाहत) याला तालुक्यातील शेरी चिखलठाण येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दि. 9 एप्रिल रोजी दुसरा आरोपी तौफिक मुक्तार शेख (वय 21 वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी) याला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या विंचूर येथून मुसक्या आवळून ताब्यात घेतले. या घटनेतील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला दि. 18 एप्रिल रोजी नेवासा-औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल गुरूदत्त येथे रात्री साडेआठ वाजे दरम्यान सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. 27 एप्रिल रोजी डिवायएसपी संदिप मिटके यांच्या पथकाने चौथा आरोपी अक्षय कुलथे याला उत्तर प्रदेशमधील चटिया ता. बीनंदनकी जिल्हा फत्तेपूर या ठिकाणाहून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com