भाविकांनी सजली साईनगरी! 'साईं'च्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ, उद्या मंदिर रात्रभर खुले राहणार

भाविकांनी सजली साईनगरी! 'साईं'च्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ, उद्या मंदिर रात्रभर खुले राहणार

शिर्डी | प्रतिनिधी

देश विदेशातील करोडो भाविकांचे (devotees) श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांच्या (Sai Baba) पुण्यतीथी उत्सवाला शिर्डीत (Shirdi) मोठ्या भक्तिमय वातावरण सुरुवात झाली. साईमंदिरात काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या हस्ते फोटो आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. पुढील चार दिवस शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा होणार असून आजपासूनच भक्तांची मांदियाळी साईनगरीत दिसून येत आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, दि. 23 ते गुरुवार, 26 ऑक्टोबर या कालावधीत श्रीसाईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. त्यानंतर उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रीसाईसच्चरित्र अखंड पारायणाचा श्रीगणेशा, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, रात्री पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम पडत आहेत. दरम्यान पारायणामुळे द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, कीर्तन, भिक्षा झोळी कार्यक्रम, आराधना विधी, खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, रात्री रथ मिरवणूक, शेजारती, कलाकार हजेरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून राज्यभरातून येणाऱ्या साई भक्तांना दर्शन घेतल्यावर यासाठी उद्या रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य वेगवेगळ्या प्रतिकृती या साकारण्यात येतात. यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा व प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतेय. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी केले.

दरम्यान पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने मंदिर परिसरात भव्य महाद्वार उभारले आहे. श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अवघी साई नगरी सजली असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तर या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. तसेच यातच दसरा देखील असल्याने या दिवशी सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com