देवळाली प्रवरातील दरोड्यापूर्वी ‘रेकी’ करणारेच पोलिसांचे हस्तक?

देवळाली प्रवरातील दरोड्यापूर्वी ‘रेकी’ करणारेच पोलिसांचे हस्तक?

राहुरी (प्रतिनिधी) / Rahuri - देवळाली प्रवरा शहरात शनिवारी रात्री आठ ठिकाणी झालेल्या दरोड्यापूर्वीच रेकी करणारे हे स्थानिक पोलिसांचे हस्तक असल्याची चर्चा होत आहे. दरोडा पडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर या भागातील अनेक घरांची व दुकानांची रेकी करण्यात आली होती. त्यात काही स्थानिक व्यक्ती असल्याची चर्चा होत आहे.

या व्यक्तींची पोलीस चौकीतील ‘कलेक्टर’शी उठबस असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून दरोड्याच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरीही तपासात पोलिसांची कोणतीच प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या अकार्यक्षतेविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

देवळाली प्रवरा शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने आठ ठिकाणी घरफोड्या करुन पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते आरामात निघून गेले. शनिवारी रात्री 1 वाजेपासून पहाटे 4 वाजे पर्यंत चोरट्यांनी धुडगूस घातला. तीन तास चोरटे शहरातील मुख्य रस्त्यालगत धुडगूस घालत असताना गस्तीवरील पोलीस एकदाही फिरकले नाही. रेकी करणार्‍या काही तरुणांनी बाहेरची टोळी बोलावून घेऊन शहरात घरफोड्या घडवून आणल्या आहेत. अशीही चर्चा होत आहे.

ज्या बंगल्यात दरोडा टाकण्यात आले, ते बंद बंगले चोरट्यांनी कुलूपे तोडून घरफोडी केली. या तिनही बंगल्यात सध्या कोणीच राहत नाही. तर सोमनाथ पठारे व शिरीष लोखंडे हे शनिवारी दुपारी बाहेगावी गेले आहे. हे बाहेरच्या टोळीला कसे समजले? हा संशोधनाचा प्रश्‍न आहे. घरफोड्या करण्यासाठी दोन स्वतंत्र टोळ्या होत्या.

पहाटे चार वाजेपर्यंत चोरटे धुडगूस घालत होते. पहाटे चारनंतर काही तरुण रनिंग साठी सोसायटी डेपो येथे जमा होतात. तर माँर्निग वॉकसाठी नागरिक सोसायटी डेपोपर्यंत चकरा मारतात. त्यावेळीही गस्तीवरील पोलीस गस्त घालताना कोणालाही दिसले नाही. यावरुन शनिवारी रात्री पोलीस गस्तीवर नव्हते का? असा प्रश्‍न पुढे येत आहे. ठसेतज्ज्ञांना ठसे न मिळाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com