दारणाच्या पाणलोटात मुसळधार !
सार्वमत

दारणाच्या पाणलोटात मुसळधार !

गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग, गंगापूर 69 टक्क्यांवर

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणा, भावली च्या पाणलोटात काल दिवसभर मुसळधार पावसाचे आगमन होत होते. दारणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत पाऊण टीएमसी हून अधिक पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे दारणातून 7952 क्युसेकने विसर्ग सुरू होता. भावलीतूनही 948 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 15775 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हा विसर्ग काल उशीरापर्यंत टिकून होता. गेल्या तीन दिवसांपासून दारणा, भावली, तसेच गंगापूरच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 145, घोटीला 93, दारणाच्या भिंतीजवळ 60 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने दारणात 809 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

7149 दलशलक्ष घनफूट क्षमतेच्या दारणात 6616 दलघफू पाणीसाठा आहे. 92.54 टक्के साठा स्थिर ठेवुन दारणातून 7952 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळी दारणातून 9956 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो नंतर 2000 क्सुसेकने कमी करण्यात आला. विशेष करुन इगतपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने त्या भागातील इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. भावलीतून 948 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

गंगापूरला पावसाचा जोर

गंगापूर धरणाच्या पाणलोटातील त्र्यंबक येथे धुव्वाधार पाऊस झाला. तेथे 24 तासांत 110, अंबोलीला 131 मिमी पाऊस झाला. गंगापूरच्या भिंतीजवळ 67 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 24 तासांत सकाळी 6 पर्यंत गंगापूरमध्ये 379 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या गंगापूरमध्ये काल सकाळी 6 वाजता 3768 दलघफू इतका पाणीसाठा तयार झाला होता. हे धरण 66.92 टक्के भरले होते. काल दिवसभरातील 12 तासांत पावसाचा जोर काहिसा मंदावला होता. त्र्यंबकला 16, अंबोलीला 39, तर गंगापूरला 15 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण काल रात्रीतून 69 टक्क्यांवर पोहचलेले असेल असा अंदाज आहे.

दारणाचा विसर्ग तसेच नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटातील निफाड परिसरातील, तसेच नाशिक शहरातील पावसाने या बंधार्‍यात पाण्याची आवक होत असल्याने गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळी या बंधार्‍यातून गोदावरीत 16865 क्युसेकने विसर्ग सुरु होता. दारणातील विसर्ग काहीसा घटविल्याने गोदावरीत पडणारा विसर्ग काहीसा कमी केला आहे. त्यामुळे हा विसर्ग 15775 क्युसेकवर स्थिर आहे. हे पाणी वेगाने जायकवाडीच्या दिशेने धावत आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून काल सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 72 हजार 57 क्युसेक पाण्याचा विसर्ग 1 जून पासून करण्यात आला आहे. हे पाणी 6.2 टीएमसी इतके आहे. गोदावरीचा उजवा कालवा 100 क्युसेकने सुरु आहे. तर डावा कालवा व जलद कालवा बंद आहेत.

जायकवाडी 59 टक्के !

जायकवाडी धरणाच्या जलाशयात काल शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 18762 क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. काल 5 वाजता जायकवाडीत उपयुक्तसाठा 45.2 टीएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 71.3 टीएमसी इतका झाला होता. या धरणाचा उपयुक्तसाठा 59 टक्के इतका झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com